Stalin N Udaynidhi Insults Pongal : तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि त्यांचे पुत्र उदयनिधी यांनी बूट घालून साजरा केला ‘धर्मनिरपेक्ष’ पोंगल  !

सामाजिक माध्यमांतून होत आहे टीका

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन (उजवीकडे) आणि त्यांचे पुत्र उदयनिधी (डावीकडे) बूट घालून पोंगल साजरा करताना

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये हिंदूंचा सण ‘पोंगल’लाही ‘धर्मनिरपेक्ष’ बनवण्याचे षड्यंत्र द्रमुक सरकारने रचले आहे. १४ जानेवारीला पोंगल साजरा करण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन एके ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेले होते. कार्यक्रमस्थळी ‘पोंगल’च्या निमित्ताने अन्न शिजवण्याचा विधी चालू होता. त्या वेळी स्टॅलिन यांनी हिजाब (मुसलमान महिलांचे चेहरा आणि मान झाकण्याचे वस्त्र) परिधान केलेली मुसलमान महिला आणि गळ्यात ‘क्रॉस’ (ख्रिस्त्यांचे धार्मिक चिन्ह) घातलेल्या ख्रिस्ती महिलांसोबत अन्न शिजवले; मात्र त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या हिंदु महिलेला बाजूला सारण्यात आले. या वेळी स्टॅलिन पितापुत्रांच्या पायांत बूट होते. सामाजिक माध्यमांतून या घटनेवरून या दोघांवर टीका होत आहे. या घटनेची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत.

१. पोंगल उत्सवात चुलीवर मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवले जाते. सूर्यदेव, इंद्र, गायी आणि बैल आणि शेतीशी संबंधित प्रतीके यांची पूजा केली जाते. या निमित्ताने पूजा करतांना तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे एका छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. यामध्ये ते हिजाब घातलेल्या आणि बूट घातलेल्या महिलेमध्ये एका मुलीला प्रसाद देत आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र आणि राज्याचे मंत्री उदयनिधी यांच्या छायाचित्रावरही असेच प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत.

यावर लोकांनी टीका करतांना म्हटले की, हिजाब परिधान करणार्‍या महिलांचा, तसेच गळ्यात क्रॉस घातलेल्या महिलांचा समावेश हा पोंगल सण धर्मनिरपेक्ष करण्याचा प्रयत्न आहे आणि हा हिंदूंचा अपमान आहे.

२. एका वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक सुमंत रमण यांनी ‘एक्स’वर पोस्ट करतांना म्हटले की, या छायाचित्रात चूल पेटवलेली दिसत नाही, भांड्यांमध्ये अन्न दिसत नाही, बूट घालणे आणि एका हिंदु महिलेला बाजूला ठेवणे, या सर्व गोष्टी द्रविडवादाचा (आर्य विरुद्ध द्रविड) फोलपणा दाखवणारे आहे.’

या पोस्टमध्ये पुढे, ‘या कार्यक्रमांचे आयोजन करणारे लोक छायाचित्र काढण्याचे काम चांगले करू शकत नाहीत का ? सरकारने नवीन प्रसिद्धी यंत्रणा नियुक्त करण्याची वेळी आली आहे’, असे सांगत उपरोधिक टीका केली.

संपादकीय भूमिका

  • स्वतःला नास्तिकतावादी म्हणणारे, सनातन धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे स्टॅलिन कुटुंब पोंगल साजरा करण्याच्या नावाखाली त्याचा अवमानच करत आहेत. याविरोधात विडंबन केल्याच्या संदर्भात हिंदूंनी तक्रार करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे. अशांना शिक्षा झाल्यावर त्यांंच्यावर काही प्रमाणात तरी वचक बसेल !
  • अन्य धर्मियांच्या संदर्भात असा अवमान करण्यात आला असता, तर त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे (शिरच्छेद करण्याचे) फतवे (इस्लाममधील कायदेशीर मत किंवा हुकूम) निघाले असते !