तोंडवळी येथे कालावल खाडीच्या पात्रात आज ग्रामस्थ उपोषण करणार

वाळूच्या अवैध उपसण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

मालवण – तालुक्यातील कालावल खाडीतील तोंडवळी येथे ‘चिन्हांकित पॉईंट बी-३ आणि बी-४’ येथे सातत्याने अहोरात्र अवैधरित्या वाळू उपसली जात आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कारवाई झाली नाही. याच्या निषेधार्थ, तसेच अवैधरित्या वाळू उपसण्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी १५ जानेवारी या दिवशी वरची करंजेवाडी, तोंडवळी येथे खाडीच्या पाण्यात उतरून साखळी उपोषण करण्याची चेतावणी तोंडवळी ग्रामस्थांनी येथील तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिली आहे.

कालावल खाडी पात्रात तोंडवळी आणि हडी येथे वाळू अवैधरित्या उपसली जात आहे. वाळू उपसणारे कामगार आणि वाळू भरण्यासाठी वापरण्यात येणार्‍या होड्यांचे मालक ग्रामस्थांवर दादागिरी करत आहेत. काही ग्रामस्थांच्या घरी येऊन धमक्या देण्याचे प्रकारही घडत आहेत. या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधूनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलन करावे लागत आहे, असे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

ग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !