औषध वितरकांची देयके टप्प्याटप्प्याने संमत करणार !
|
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बी.एम्.सी.) २७ रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणार्या ‘ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन’ने १३ जानेवारीपासून औषधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या ४ वर्षांत पालिकेकडून १२० कोटी रुपयांची थकबाकी देण्यात आलेली नाही. यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती; पण ‘औषध वितरकांची ५० टक्के देयके पुढील दोन आठवड्यांमध्ये, तर उर्वरित देयके १५ फेब्रुवारीपर्यंत संमत करण्यात येतील’, असे लेखी आश्वासन महानगरपालिकेने औषध वितरकांना दिले. त्यामुळे ठप्प झालेला औषध पुरवठा १४ फेब्रुवारीपासून पूर्ववत् करण्याचा निर्णय फाऊंडेशनने घोषित केला. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि उपनगरीय रुग्णालये येथे निर्माण होणार असलेली औषधांची आणीबाणी टळली.