जालना येथील ‘श्री दत्त आश्रम’ शिष्य परिवाराकडून माऊलींच्या पूजेसाठी दान केले सोन्या-चांदीचे अलंकार !
आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या नित्याच्या पूजा उपचारासाठी जालना येथील सद्गुरुनगरच्या ‘श्री दत्त आश्रम’ यांच्या शिष्य परिवारांनी सोने आणि चांदी यांची आभूषणे माऊलींच्या चरणी भेट दिली आहेत. सर्व आभूषणे आणि पूजेच्या वस्तू अंदाजे ३० लाख रुपये किमतीची असून यामध्ये ११ तोळ्यांच्या सोन्याच्या कंठीचा समावेश आहे. यामुळे माऊलींच्या समाधीला सोन्या-चांदीच्या आभूषणांनी सजवण्यासाठी आणखी जादाच्या वस्तू मिळाल्या आहेत, तर पूजेसाठी यातील काही भांड्यांचा वापर होणार आहे. या सर्व वस्तू आळंदी देवस्थानाचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी स्वीकारल्या. सर्व दानशूर भक्तांचा माऊलींच्या समाधीपुढे सन्मान करण्यात आला.
याविषयी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले की, पूजा उपचारासाठी या वस्तू नित्याने लागतात. माऊलींच्या पूजेसाठी चांदीची भांडी, सजावटीसाठी चांदी आणि सोन्याची आभूषणे देवस्थानकडे आहेत. माऊलींवरील श्रद्धेपोटी जालन्यातील भाविकांनी ही भेट दिली आहे.