संपादकीय : न संपणार्या यातना !
मागील वर्षी ४ ऑगस्टपासून अल्पसंख्य समुदायांविरुद्ध झालेल्या बहुतेक घटना ‘राजकीय स्वरूपा’च्या होत्या. त्या धार्मिक नव्हत्या, असे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे वक्तव्य बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने केले आहे. बांगलादेश सरकारने अशी भूमिका घेणे, यात धक्कादायक किंवा आश्चर्यकारक वाटण्यासारखे असे काहीच नाही. मागील अनेक घटनांद्वारे तेथील अंतरिम सरकारने त्याचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष वारंवार प्रकट केला आहे. बांगलादेशात हिंदूंनी नरकयातना भोगणे, हे काही नवीन नव्हते; मात्र शेख हसीना यांना सत्ताच्युत केल्यानंतर तेथील धर्मांध मुसलमानांना अशी कुकृत्ये करण्यासाठी तेथील सरकार, प्रशासन, पोलीस आणि सैन्य यांची साथ लाभली. या वेळी देश-विदेशांतील हिंदूंनी याच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे ‘याविषयी आम्ही गंभीर नोंद घेतली आहे’, असे दाखवण्यासाठी सरकारने या प्रकरणांचा अभ्यास करून अहवाल सादर केल्याचे नाटक केले आणि अंततः ‘अल्पसंख्यांकांवर म्हणजेच हिंदूंवर झालेली आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची होती’, असे सांगून स्वतःचे हात झटकले. ‘हिंदूंवरील आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची आक्रमणे’, हे कथानक मागील काही महिन्यांपासून साम्यवादी, भारतद्वेष्टे आणि हिंदुद्वेष्टे यांनी रचले असून त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बांगलादेशाचा अन् त्याहून अधिक धर्मांध मुसलमानांचा बचाव करण्यासाठी वापर करण्यात आला.
बांगलादेशातील हिंदू हे शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाचे समर्थक होते. शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशात म्हणे एकाधिकारशाही होती. त्यांचे सरकार उलथवून तेथील नागरिकांनी एकप्रकारे तेथील जनतेवर उपकार केल्याची भाषा तेथील जिहाद्यांकडून वापरली जात आहे. त्यामुळे ‘जेव्हा शेख हसीना या देशातून पळून गेल्या, त्या वेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचे समर्थक असणार्या हिंदूंना लक्ष्य केले’, असा कांगावा जिहाद्यांकडून केला जात आहे. बांगलादेशात एखाद्या पक्षाचा राजकीय समर्थक असण्याची शिक्षा जर एखाद्या समूहाला अशी दिली जात असेल, तर तेथील समाजाच्या जडणघडणीत काही अडचण आहे, हे प्रथम समजून घ्यायला हवे. एखाद्या राजकीय पक्षाच्या समर्थकांचा गळा चिरणे, झाडाला उलटे टांगून त्याला मारणे, घरांना आग लावून त्यात लोकांना जाळून मारणे, महिलांवर सामूहिक बलात्कार करणे, असले आसुरी प्रकार करणारा समाजातील घटक हा ‘माणूस’ म्हणवून घेण्याच्या तरी लायकीचा आहे का ? त्यामुळे ‘राजकीय कारणांमुळे हिंदूंच्या हत्या केल्या’, असे सांगणारा समाज आणि त्याचे अश्लाघ्य समर्थन करणारे सरकार ज्या देशात सत्तेत असेल, तर तेथे अराजकच माजणार, हे सांगायला कुणा राजकीय विश्लेषकाची आवश्यकता नाही. हिंदूंवरील आक्रमणांना ‘राजकीय स्वरूप’ प्राप्त झाल्यावर ‘ही आक्रमणे आणखी किती काळ चालतील ?’, हे सांगता येणार नाही. हिंदूंचा नरसंहार झाकण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. ‘हिंदूंचा वर्षभरात जो काही नरसंहार झाला, त्याला तेच स्वतः उत्तरदायी आहेत’, असाच सरकारचा आविर्भाव दिसतो. त्यामुळे हिंदूंवर अत्याचार करणार्यांवर भविष्यात कारवाई होईल, अशी अपेक्षाच नको. त्यामुळे एक तर अन्याय सहन करणे किंवा त्याचा प्रतिकार करणे, हे दोनच पर्याय तेथील हिंदूंच्या हातात आहेत. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी चिन्मय दास यांनी मोठे आंदोलन उभारले होते; मात्र त्यांना अटक करून सरकारने ते चिरडले. त्यामुळे प्रतिकाराचा मार्ग हा सरळ-सोपा नक्कीच नाही. या मार्गावरून त्यांना एकटे चालावे लागेल. अशा वेळी भारतीय हिंदूंचे दायित्व वाढते. हिंदूंनी संघटित होऊन भारत सरकारला बांगलादेशावर कारवाई करण्यासाठी भाग पाडणे आवश्यक आहे. बांगलादेशी हिंदूंच्या यातना रोखण्याचा हाच एकमेव उपाय आहे !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबण्यासाठी भारत सरकारने पावले उचलणे आवश्यक ! |