Stone Pelting At Tapti Ganga Express : महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या ताप्तीगंगा रेल्वेवर जळगावमध्ये दगडफेक !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

जळगाव – प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या ताप्तीगंगा रेल्वेगाडीवर जळगावमध्ये दगडफेक करण्यात आली. यात रेल्वेच्या खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने यात कुणीही घायाळ झाले नाही. सूरतहून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे जात होती. ही रेल्वेगाडी जळगाव येथे आली असतांना हा प्रकार घडला. एका टवाळखोराने खोडकरपणा म्हणून गाडीवर दगड फेकल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पाटील यांनी दिली आहे. (महाकुंभमेळ्याला जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणे, हा खोडकरपणा कसा असू शकतो ? एवढेही पोलिसांना कळत नाही का ? पोलिसांनी अशी विधाने करणे म्हणजे दगडफेक करणार्‍यांचे समर्थन केल्यासारखेच आहे ! – संपादक) संबंधिताचा शोध चालू आहे. प्रवाशांनी रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे.


महाकुंभ मेळ्यासाठी जाणार्‍या रेल्वेवर दगडफेक करणार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – जळगाव येथे रेल्वेगाडीवर केलेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. धार्मिक यात्रेकरूंवर होणार्‍या अशा आक्रमणांना समाज कदापी सहन करणार नाही. असाच भयंकर प्रकार वर्ष २००२ मध्ये राममंदिराची कारसेवा करण्यासाठी जाणार्‍या रामभक्तांच्या संदर्भात गुजरातमधील ग्रोधा येथे घडला होता. तसेच अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रेवरही दगडफेकीच्या घटना घडतच आहेत. अशा धर्मांध समाजकंटकांवर वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर आज रेल्वेगाडीवर दगड मारणारे उद्या रेल्वेगाडी जाळण्यासाठी मागे-पुढे पहाणार नाहीत. सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवर काही धर्मांध मुसलमान ‘कुंभमेळा होऊ देणार नाही’, अशा धमकी देत आहेत. आता अशा प्रकारे रेल्वेवर दगडफेक करून त्यांनी प्रत्यक्ष कृती करायला प्रारंभ केल्याचे दिसत आहे. कोट्यवधी हिंदू भाविकांच्या उपस्थितीत होणार्‍या कुंभमेळ्यात हिंदू संघटित होऊ नयेत आणि त्यांनी धर्माचरण करू नये, म्हणून हिंदुविरोधी शक्ती कार्यरत आहेत.

दोषींच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता असून त्यांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत, याचेही अन्वेषण व्हायला हवे. ‘सामाजिक माध्यमांवर कुंभमेळा होऊ देणार नाही’, असे म्हणणार्‍या धर्मांधांवरही शासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.


रेल्वेवर दगडफेक करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी जळगाव येथे पोलीस अधीक्षकांना निवेदन

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देतांना हिंदू !

जळगाव – ताप्तीगंगा एक्सप्रेसवर दगडफेक झाली. धार्मिक यात्रांसाठी प्रवास करणार्‍या हिंदूंवर आक्रमणे करणे, हे आपल्या देशात अनेक वर्षांपासून होत आहे. जळगाव येथेही श्री रामनवमी, गणेशमूर्ती विसर्जन अशा अनेक सण-उत्सवांच्या वेळी आपल्याला हा अनुभव आलेला असेल. मागील वर्षी अयोध्या येथे भाविकांना घेऊन जाणार्‍या रेल्वेसाठीही किती बंदोबस्त द्यावा लागला, हे सर्वांना ठाऊक आहे. असे असताना महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या भाविकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न जळगावमध्ये होणे अत्यंत चुकीचे आहे. दगडफेक करणार्‍यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, रेल्वेच्या आवश्यक यंत्रणांना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र पोलीस पुरवण्याची व्यवस्था करण्यास सुचवावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली. हे निवेदन गृहमंत्री आणि गृह सचिव यांच्या नावेही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, जुलै २०२४ मध्ये भुसावळ – सुरत पॅसेंजरवरही अमळनेर येथे काही मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केलेली होती. त्याचे व्हिडिओ प्रसारित झाले होते. त्या वेळी २ दिवसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला; पण पुढे काहीही कारवाई झालेली नाही. आता ताप्तीगंगावरील दगडफेकीच्या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेल्याचे समजते. (वास्तविक अशी मागणी करण्याची वेळ हिंदूंवर येऊ नये. पोलीस प्रशासनाने स्वतःहून अशी कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • केवळ हिंदूंच्याच सण-उत्सवांच्या वेळी हिंदूंसह त्यांची वाहने, तसेच रेल्वे यांवर आक्रमणे केली जातात, हे लक्षात घ्या !
  • महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने सोडलेल्या सर्वच विशेष गाड्या सुरक्षितपणे कुंभक्षेत्री पोचतील, याची दक्षता रेल्वेमंत्र्यांनी घ्यावी !
  • कुंभमेळ्याच्या यात्रेकरूंच्या संदर्भात अशी घटना घडणे चिंताजनक !