Zelensky’s Proposal To North Korea : रशियाने युक्रेनच्या सैनिकांना सोडावे, मग आम्ही तुमचे सैनिक परत करू !

  • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचा उत्तर कोरियाला प्रस्ताव

  • उत्तर कोरियाचे सैन्य रशियाला युक्रेनशी चालू असलेल्या युद्धात करत आहे साहाय्य

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी रशियाला साहाय्य करणार्‍या उत्तर कोरियासमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. झेलेंस्की यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, जर रशियात कैदेत असलेल्या युक्रेनच्या सैनिकांना सोडले, तर कुर्स्क प्रदेशात पकडलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकांना सोडण्यास आम्ही सिद्ध आहोत. सैन्याच्या देवाणघेवाणीतून हे शक्य आहे. आमच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क सीमावर्ती भागात रशियाच्या सैन्यासमवेत लढणार्‍या २ उत्तर कोरियाई सैनिकांना पकडले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून युक्रेन उत्तर कोरियाच्या माध्यमातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.

झेलेंस्की पुढे म्हणाले की,

जगाला हे स्पष्ट असले पाहिजे की, रशियाचे सैन्य उत्तर कोरियाच्या सैनिकी साहाय्यावर अवलंबून आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ३ वर्षांपूर्वी ‘नाटो’ला (अमेरिका, तसेच युरोपमधील २९ देशांची सैनिकी संघटना) चेतावणी देत युद्धाला आरंभ केला होता आणि इतिहास पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता उत्तर कोरियाच्या सैनिकी पाठिंब्याविना रशिया काम करू शकत नाही.

झेलेंस्की यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, रशियन सैन्याशी झालेल्या लढ्यात उत्तर कोरियाचे जवळपास ३ सहस्र सैनिक मारले गेले किंवा घायाळ झाले. यावर दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थेने सांगितले की, २६ डिसेंबरला पकडलेल्या उत्तर कोरियाच्या सैनिकाचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला. संस्थेचा अंदाज आहे की, उत्तर कोरियाचे १ सहस्र सैनिक मारले गेले किंवा घायाळ झाले, ज्याचे कारण युद्धभूमीच्या वातावरणाचा आणि ड्रोन आक्रमणांचा सामना करण्यास त्यांची क्षमता नव्हती.