‘घर विकल्यामुळे मनात त्याविषयीचे विचार न येता खर्या अर्थाने काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल’, असे साधिकेला वाटणे
‘माझे आई-बाबा (सौ. सरस्वती कुलकर्णी आणि श्री. अरविंद कुलकर्णी) रामनाथी आश्रमात रहायला आल्यावर राहूलने (भावाने) आई-बाबांच्या संमतीने आमचे गावाकडील घर विकले. त्या वेळी कोरोनाची साथ चालू असल्याने आई-बाबांना घरी जाता आले नाही. राहूलने आईच्या इच्छेनुसार घरातील वस्तू बहिणीला आणि साधकांना दिल्या. आई-बाबांनी अतिशय कष्टाने बांधलेले घर त्यांच्या वृद्धावस्थेत विकले आणि त्यांनी घेतलेल्या सर्व वस्तू इतरांना दिल्या. या प्रसंगाच्या वेळी मला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील कथा आठवली.
‘गोंदवलेकर महाराज यांच्या वृद्ध आईला काशीला जायचे असते. तेव्हा त्यांची आई महाराजांना म्हणते, ‘‘तू मला काशीला घेऊन चल; पण मी गेल्यावर हे घर नीट सांभाळ.’’ आईला काशीला घेऊन निघत असतांना महाराज त्यांच्या घरावर तुळशीपत्र ठेवतात, म्हणजे लोकांना सांगतात, ‘‘या घरातून तुम्हाला हवे असेल, ते सर्व घेऊन जा.’’ महाराजांनी असे सांगितल्यावर लोक लगेचच महाराजांच्या घरातील सर्व वस्तू घेऊन जातात आणि त्यांच्या आईसमोरच सर्व घर रिकामे होते. त्या वेळी महाराज आईला म्हणतात, ‘‘काशीला जातांना तुझ्या मनात घराविषयी विचार यायला नको. आता तू आनंदाने काशीयात्रा करू शकतेस.’’
आमचे काहीसे या गोष्टीसारखेच झाले. आम्ही सर्व जण रामनाथीला (काशीला) आलो असलो, तरी आमच्या मनात घराविषयी विचार यायचे. आता घर विकल्यामुळे आमच्या मनात घराचे विचार येणार नाहीत आणि खर्या अर्थाने आमची काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल.
‘परात्पर गुरुदेव, कलियुगातील संधीकाळात आपणच आम्हाला मायेच्या जाळ्यातून मुक्त करत आहात. आपणच आमच्याकडून साधना करवून घेऊन आपल्या चरणांशी घ्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ढवळी, फोंडा, गोवा.
‘आपत्काळात बर्याच साधकांना आपली घरे विकून दुसरीकडे रहायला जावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचा दृष्टीकोन कसा असावा, हे सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांच्या लेखावरून लक्षात येईल. या लेखाबद्दल सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांचे अभिनंदन !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |