महर्षींच्या आज्ञेने ‘कार्तिक दीपम् (देवदिवाळी)’ या दिवशी ‘वण्णामलई’ (तमिळनाडू) या पर्वताला प्रदक्षिणा घालतांना साधकाला जाणवलेली सूत्रे

‘महर्षि आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे या वर्षीच्या ‘कार्तिक दीपम्’ (१५.११.२०२४, देवदीपावली) या दिवशी महर्षींनी तमिळनाडू राज्यातील तिरुवण्णामलई या पवित्र भूमीमध्ये जाऊन देवदर्शन करण्यास सांगितले होते. तिरुवण्णामलई येथे गेल्यावर श्री. वाल्मिक भुकन यांना लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘प.पू. गुरुदेवांचे आरोग्य चांगले राहून त्यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी वण्णामलई या पर्वताला घातलेली पायी प्रदक्षिणा ! 

१ अ.   १४ किलोमीटर लांबीच्या पूर्ण प्रदक्षिणा मार्गावर वेगवेगळ्या देवतांची पुष्कळ मंदिरे असणे : ‘वण्णामलई’ या पर्वताला पायी प्रदक्षिणा घालतात, त्याला ‘गिरीवलम्’ असे म्हणतात. हा मार्ग १४ किलोमीटर लांबीचा आहे. पूर्ण प्रदक्षिणा मार्गावर वेगवेगळ्या देवतांची पुष्कळ मंदिरे असून ८ मुख्य शिवलिंगांची मंदिरे आहेत. ‘प.पू. गुरुदेवांचे आरोग्य चांगले राहून त्यांना दीर्घायुष्य मिळावे’, यासाठी वण्णामलई या पर्वताला आम्ही (श्री. वाल्मिक भुकन आणि सहसाधक यांनी) पायी प्रदक्षिणा घातली.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१ आ. शिव मंदिरासमोर उभे राहून प्रार्थना करणे आणि लगेचच शंखनाद होऊन जणू ‘शिवाने साक्ष दिली’, असे वाटणे : आम्ही सकाळी ८ वाजता शिवाचा नामजप करत प्रदक्षिणा घालण्यास आरंभ केला आणि दुपारी १२.३० वाजता प्रदक्षिणेची सांगता केली. या वेळी वातावरणात पुष्कळ आनंद आणि चैतन्य जाणवत होते. आम्ही प्रथम अग्निलिंगाच्या मंदिराचे दर्शन घेतले. तेथील शिव मंदिरासमोर उभे राहून आम्ही प्रार्थना केली, ‘हे भगवान शिव, तू आमच्या तिन्ही गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे) आरोग्य चांगले ठेव. या आपत्काळामध्ये सर्व साधकांचे रक्षण कर. सनातन संस्थेचे कार्य वेगाने वाढू दे आणि पृथ्वीवर हिंदु राष्ट्र लवकर येऊ दे.’

प्रार्थना करतांना त्याच क्षणाला कोणीतरी शंखनाद केला. तो ऐकून मला जाणवले, ‘आपण केलेली प्रार्थना शिवाने स्वीकारली आणि त्याची साक्षही लगेच दिली. त्यानंतर पुढे येणार्‍या शिवलिंगाच्या मंदिरात प्रार्थना करत असतांना पुन्हा शंखनाद झाला. अशी अनुभूती देवाने ४ – ५ वेळा दिली.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

२. प्रदक्षिणा मार्गावरील वैशिष्ट्ये

२ अ. मार्गावर झालेली प्राणी आणि पक्षी यांची शुभ दर्शने ! : आम्हाला वाटेत मोर, हरिण आणि काळा कुत्रा दिसला. एका ठिकाणी बाजूच्या जंगलामध्ये २ मोर होते. त्यातील एक मोर डोळे बंद करून भूमीवर बसला होता. त्याला पाहून असे वाटले की, तो ध्यान करत आहे.

२ आ. रमण महर्षि यांच्या समाधीचे दर्शन घेणे : मार्गावर रमण महर्षि यांचा आश्रम होता. आम्ही त्या आश्रमात जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन करून पुढे निघालो.

२ इ. मार्गावरून लाखो शिवभक्त नामजप ऐकत शांतपणे चालत असणे : या प्रदक्षिणामार्गावर लाखो शिवभक्त चालत होते. सर्वांत आश्चर्य म्हणजे लाखो भक्त चालत होते; पण कोणताही गोंगाट नव्हता. प्रदक्षिणामार्गावर ठराविक अंतरावर ध्वनीक्षेपक (स्पीकर) लावून त्यावर शिवाचा नामजप लावला होता. तो नामजप ऐकत भाविक शांतपणे चालत होते. कुठेही चित्रपटातील गाणी लावलेली नव्हती.

२ ई. प्रदक्षिणा करतांना भक्तांचा भाव ! : या ठिकाणी ९५ टक्के भक्त प्रदक्षिणा घालतांना पादत्राणे घालत नाहीत. या सर्वांचा भाव असतो की, ‘आपण साक्षात् शिवाला प्रदक्षिणा घालत आहोत.’ त्यामुळे प्रदक्षिणेचे १४ किलोमीटरचे अंतर कुणीही पादत्राणे घालत नाही.

२ उ. प्रदक्षिणा मार्गावर भक्तांनी चालवलेली जवळ जवळ १ सहस्र अन्नदानछत्रे असणे आणि तेथे शांतपणे अन्नदानाचे कार्य चालू असणे : या ठिकाणी अन्नदानाला पुष्कळ महत्त्व आहे. पुष्कळ दूरदूरहून लाखो भक्त येतात. तेव्हा ‘या सर्वांची जेवणाची व्यवस्था काय असणार ?’, असा प्रश्न सर्वांना पडू शकतो; पण या प्रदक्षिणा मार्गावर जवळजवळ १ सहस्र अन्नदानछत्रे आहेत. ‘या ठिकाणी कुणीही उपाशी राहू नये’, अशी व्यवस्था आहे. ही व्यवस्था सरकार पहात नाही, तर भक्तच सर्व व्यवस्था करतात. तेथे कुठेही गोंधळ, चेंगराचेंगरी आदी होतांना आम्हाला दिसली नाही. यावरून लक्षात आले की, भगवंताच्या दारात कुणीही उपाशी रहात नाही आणि त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. ‘भगवंत ही सृष्टी कशी चालवतो ?’, हे या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष पहायला मिळाले.

३. प्रदक्षिणा घालतांना आलेल्या अनुभूती

३ अ. ‘देव समवेत आहे’, याची प्रचीती येणे : प्रदक्षिणा घालतांना ‘देवाने क्षणोक्षणी तो समवेत आहे’, याची प्रचीती दिली. ही पूर्ण प्रदक्षिणा घालतांना आम्हाला थकवा आला नाही. सतत नामजप आणि प्रार्थना होत होत्या. मन पूर्णपणे आनंदी होते.

३ आ. प्रदक्षिणा संपत आल्यानंतर पूर्ण पर्वताचे दर्शन होऊन कृतज्ञता वाटणे : आम्ही सकाळी प्रदक्षिणेस आरंभ केला. तेव्हा तिरुवण्णामलई पर्वतावर पुष्कळ धुके होते. त्यामुळे त्याचे पूर्ण दर्शन होत नव्हते. आमची प्रदक्षिणा संपत आल्यानंतर थोडा वेळ ऊन पडले आणि आम्हाला पूर्ण पर्वताचे दर्शन झाले. दर्शन झाल्यावर भगवान शिव आणि तिन्ही गुरु यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

४. प्रदक्षिणेनंतर भ्रमणभाषवर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याशी बोलायला मिळाल्याने प्रदक्षिणेचे खरे फळ आता मिळाले’, असे वाटणे 

प्रदक्षिणा पूर्ण करून आम्ही खोलीत आलो. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प.पू. गुरुदेवांना भ्रमणभाष केला. तेव्हा आम्हालाही प.पू. गुरुदेवांशी बोलण्याचे भाग्य मिळाले. ज्याप्रमाणे तप केल्यानंतर देवदर्शन घडून आपल्याला आनंद मिळतो, तसा आनंद आम्हाला झाला. प.पू. गुरुदेवांचा आवाज ऐकल्यावर पुष्कळ कृतज्ञता वाटून आमची भावजागृती झाली आणि ‘पूर्ण प्रदक्षिणेचे खरे फळ आता मिळाले’, असे वाटले.

‘महर्षि, प.पू. गुरुदेव, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, तुमच्या अनंत कृपेमुळे आम्हाला भगवंताची ही लीला पहायला मिळाली. या लीलेमधून आम्हा साधकांना शिकता येऊन ‘ते आमच्या कृतीमध्ये येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे !’

– श्री. वाल्मिक भुकन, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (१२.१२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक