गोरेगाव, मुंबई येथील ‘हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळ्या’ला विविध संघटना अन् नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

१६८ हून अधिक आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रप्रेमी संघटनांचा सहभाग !

मेळ्यातील काही प्रदर्शन कक्ष

मुंबई – ‘हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संस्थान, मुंबई’ च्या वतीने गोरेगाव (प.) येथील लक्ष्मी पार्क, बांगुरनगर येथील महाराणी अहिल्याबाई होळकर मैदानावर ९ ते १२ जानेवारी या कालावधीत आयोजित भव्य सेवा मेळ्याला विविध संघटना आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळ्यात १६८ हून अधिक आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रप्रेमी संघटनांनी आपले प्रदर्शन कक्ष उभारून प्रदर्शनाला भेट देणार्‍या लोकांमध्ये जनजागृती केली. या वेळी उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शन कक्षांसह विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनांतून या मेळ्यातून हिंदू बांधवांचे प्रबोधन करण्यात आले.

या मेळ्याच्या प्रथम दिवशी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरि यांची वंदनीय उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. या मेळ्याला देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार, महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी.पी. राधाकृष्णन, भाजपचे माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी, शिवसेनेचे नेते श्री. संजय निरुपम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सहस्रो राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिकांनी या मेळ्याला भेट दिली. चार दिवसांच्या या मेळ्यात दिंडी यात्रा, गंगा आरती, विविध प्रबोधनात्मक नाटिका, देवतांचे स्तोत्र पठण, विविध मान्यवरांचे मार्गदर्शन या सर्वांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शाळांच्या सहस्रो विद्यार्थ्यांनी सुद्धा या मेळ्याचा लाभ घेतला आणि प्रदर्शन पाहिले. आयोजकांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आचार्य वंदन, कन्या वंदन, गायन स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमांतून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात अध्यात्म, राष्ट्र-धर्म, आयुर्वेद, योग, संस्कृती याविषयीचे ज्ञान या मेळ्याच्या माध्यमांतून पोचले. उत्साहपूर्ण वातावरणात पडलेल्या या मेळ्यात सहभागी संस्थांनी ‘हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संस्थान’चे आभार व्यक्त केले.