सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या वतीने ‘संयुक्त राष्ट्रां’त ‘पर्यावरणातील पालट’ या विषयावर संशोधन सादर

अझरबैजानची राजधानी बाकू येथे ‘संयुक्त राष्ट्रां’नी आयोजित केलेल्या ‘सीओपी २९’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ आणि ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ यांच्या वतीने ‘संयुक्त राष्ट्रां’त ‘पर्यावरणातील पालट’ या विषयावर १९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी संशोधन सादर करण्यात आले. या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी सादर केलेला शोधनिबंध येथे दिला आहे.

५ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘वर्ष २०१५ मध्ये झालेला पॅरिस करार आणि सद्यःस्थिती, पर्यावरणाच्या र्‍हासाच्या संदर्भात आध्यात्मिक संशोधनाचे अनुमान निराळे, ‘प्राचीन भारतीय शास्त्रां’मधील संकल्पना अन् पंचमहाभूतांचे असुंतलन आणि परिणाम’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे दिला आहे.      

 (भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/870252.html

______________________________________________

७. कालचक्राचा परिणाम

जेव्हा कालचक्र खालच्या दिशेला असते, तेव्हा त्याचा परिणाम मानवी वर्तनावर होतो. वातावरणातील नकारात्मकतेमुळे लोकांच्या निर्णयक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यांच्याकडून स्वतःच्या हीन दर्जाचे वर्तन केले जाते. अशा वेळी लोक अधिक भौतिकवादी (स्वार्थी) आणि आत्मकेंद्रित होतात अन् स्वतःच्या लाभासाठी पर्यावरणाकडे दुर्लक्ष करतात. यामुळे सर्वत्र सामजिक अशांतता, ध्रुवीकरण (दोन विरोधी गोष्टींमध्ये विभाजित होणे), चकमकी आणि युद्ध अशा घटना घडतात.

– श्री. शॉन क्लार्क

८. पर्यावरणातील पालटांची मूळ कारणे

अध्यात्मशास्त्रानुसार पर्यावरणातील पालटांची कारणे समग्रपणे पाहिली, तर सध्या पृथ्वीवर होत असलेले पर्यावरणातील पालट हे ९८ टक्के कालचक्राशी संबंधित (चक्रीय) पालटांमुळे, तर केवळ २ टक्के पालट मानवांच्या वर्तनामुळे घडून येत आहेत. हे पालट म्हणजे पृथ्वीची संक्रमणावस्था आहे.

८ अ. ९८ टक्के कालचक्राशी संबंधित (चक्रीय) पालटांविषयी माहिती ! :

१. सामान्यतः ६७ टक्के पालट हे कालचक्राशी संबंधित (चक्रीय) असून ते आध्यात्मिक कारणांमुळे घडत आहेत. वातावरणातील रज-तमाच्या अधिक्यामुळे पंचमहाभूतांच्या संतुलनावर परिणाम होतो, उदा. जेव्हा अग्नितत्त्वाचे संतुलन बिघडते, तेव्हा सर्वत्र तापमानाची वाढ होते.

२. उर्वरित ३३ टक्के पालट हे रज-तमाच्या अधिक्याखाली असलेल्या मानवामुळे घडून येत आहेत. अशा व्यक्ती अयोग्य निर्णय घेतात. त्यांचा दुष्परिणाम पर्यावरणावर होतो.

९. पर्यावरणाच्या र्‍हासाची गती वाढण्याचा कालावधी

पॅरिस येथील परिषदेत पर्यावरणातील पालटांविषयी जी काही प्रारूपे आणि अंदाज बांधण्यात आले होते, त्याहीपेक्षा पुष्कळ अधिक वेगाने अन् तीव्रतेने पर्यावरणाचा र्‍हास होतांना दिसतो. या विषयावर आध्यात्मिक संशोधन करणार्‍या ‘एस्.एस्.आर्.एफ.’ने वर्ष २००६ मध्येच पर्यावरणातील या तीव्र र्‍हासाचे कारण केवळ स्थुलातील नसून आध्यात्मिक असल्याचे अनुमान काढले होते. ज्याप्रमाणे आपण घरात साचलेली घाण काढून टाकण्यासाठी घराची स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे जेव्हा आध्यात्मिक प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढते, तेव्हा निसर्ग स्वतःच त्याचे संतुलन राखण्याची प्रक्रिया चालू करतो. संतुलनाची ही प्रक्रिया नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील टोकाचे पालट या माध्यमांतून प्रगट होते.

आध्यात्मिक संशोधनानुसार विनाशकारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यांचे व्यापक दुष्परिणाम थांबवण्याचा कालावधी न्यून होत आहे. पुढील काही वर्षांत किंवा फार तर एका दशकाने या विनाशाला आरंभ होणार आहे. ही संपूर्ण मानवजातीसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे यासाठी तात्काळ कृती करणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यावरणातील पालटांची तीव्रता न्यून करण्याच्या उपायांची तीव्रता वाढवणे आवश्यक आहे, तसेच भविष्यात पर्यावरणातील पालटांमुळे येणार्‍या संकटांपासून रक्षण होण्याच्या दृष्टीने विविध पातळीवर सिद्धता करणे महत्त्वाचे आहे.

१०. सात्त्विकतेचा पंचमहाभूतांवर होणारा परिणाम दर्शवणारी उदाहरणे

१० अ. यज्ञाच्या ज्वाळा : यज्ञातून निर्माण होणार्‍या ज्वाळांवर एक संशोधन करण्यात आले होते. त्यात २ सूत्रे लक्षात आली की,

१. एक म्हणजे यज्ञाची ज्वाळा ही अव्यवस्थित आणि अनियमित आहे; कारण हा यज्ञ एका पुरोहिताने सामान्य ठिकाणी केला होता.

२. दुसरे म्हणजे यज्ञाची ज्वाळा ही प्रमाणबद्ध आणि सुव्यवस्थित दिसत आहे; कारण हा यज्ञ रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात करण्यात आला होता. आश्रमात पुष्कळ सात्त्विकता असल्याने, तसेच या यज्ञाचे पौरोहित्य एका उच्च कोटीच्या संतांनी केले असल्याने या यज्ञातून अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतांना दिसत आहेत. यावरून वातावरणातील सात्त्विकतेमुळे तेजतत्त्व त्याचे वर्तन कसे पालटते, हे या संशोधनावरून सिद्ध होते.

१० आ. मंत्रोच्चार : सात्त्विकतेचा पंचमहाभूतांवर होणारा परिणाम दर्शवणारे आणखी एक उदारहण पाहू. संस्कृतमधील मंत्र पुष्कळ सात्त्विक असतात. नियंत्रित वातावरणात केलेल्या एका प्रयोगात मंत्रोच्चार न करता आणि मंत्रोच्चार करून ज्योतीची उंची मोजण्यात आली. त्या वेळी ‘मंत्रोच्चारामुळे ज्योतीची उंची वाढते’, असे लक्षात आले.

१० इ. मानवी आचरण : मुंबईतील दोन सदनिकांमधील पाणी भरलेल्या बाटल्यांची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ नावाच्या उपकरणाने मोजण्यात आली. एका अणूवैज्ञानिकाने वस्तूंची प्रभावळ मोजण्यासाठी हे उपकरण विकसित केले आहे. ज्या सदनिकेतील रहिवासी साधना करत नव्हते, त्यांच्या पाण्याच्या बाटलीची प्रभावळ नकारात्मक आणि ज्या सदनिकेतील रहिवासी साधना करत होते, त्यांच्या पाण्याच्या बाटलीची प्रभावळ सकारात्मक आढळून आली. यावरून मानवी आचरणाचा परिणाम पंचमहाभूते आणि वातावरण यांवर होतो, हे सिद्ध होते.

१० ई. पाण्याने भरलेले ५ पेले ठेवलेले आहेत. ज्या पेल्यातील पाणी अत्यंत स्वच्छ दिसते, त्यात प्रचंड नकारात्मक ऊर्जा आहे आणि ज्या पेल्यातील पाणी गढूळ दिसत आहे, त्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा आहे. ‘स्थुलातील प्रदूषण म्हणजे आध्यात्मिक प्रदूषण असतेच, असे नाही, तसेच स्वच्छ आणि नीटनेटके दिसणारे एखादे स्थान सात्त्विक असतेच, असेही नाही’, हे आमच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

पर्यावरणाची हानी टाळता येण्यासाठी करायचे उपाय


१. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परिवर्तन होणे आवश्यक ! : अमेरिकेतील पर्यावरणविषयक अधिवक्ता जेम्स गुस्ताव स्पॅत यांनी ‘पर्यावरणाची हानी टाळण्यामधील अध्यात्माचे महत्त्व’, याविषयी काढलेले उद्गार पाहू. ते म्हणतात, ‘पूर्वी मला पर्यावरणाची हानी होण्यासाठी ‘जैवविविधता नष्ट होणे, परिसंस्था कोसळणे आणि हवामानातील पालट हे घटक कारणीभूत आहेत, तसेच ‘पुढील ३० वर्षांत विज्ञानाने चांगले कार्य केल्यास ही हानी भरून काढता येईल’, असे वाटत होते; मात्र ‘मी चुकीचा विचार करत आहे’, हे माझ्या लक्षात आले. स्वार्थीपणा, लालसा आणि उदासीनता हे पर्यावरणाशी संबंधित प्रमुख प्रश्न आहेत आणि ते सोडवण्यासाठी जगात सांस्कृतिक अन् आध्यात्मिक परिवर्तन होणे आवश्यक आहे; पण ‘हे परिवर्तन कसे घडवून आणायचे ?’, हे आम्हा शास्त्रज्ञांना ज्ञात नाही.’

२. अधर्माचरणाचा परिणाम : प्रत्यक्षात ही संकल्पना नवीन नाही. प्राचीन भारतीय शास्त्रात संस्कृत भाषेत याविषयीचे संदर्भ आहेत. ‘चरक संहिते’मध्ये सांगितले आहे, ‘जेव्हा सर्वत्र अधर्माचरण अथवा आध्यात्मिक प्रदूषण वाढते, तेव्हा त्याचे परिणाम मनुष्याचे जीवनमान खालावणे, साथीचे रोग पसरणे, नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होणे, अशा घटनांमधून प्रतिबिंबित होतात, तसेच युद्धे आणि संघर्ष वाढतात. परिणामी समाजाचा विनाश होतो.’ ही सर्वांसाठी गंभीर चेतावणीच आहे.

३. सात्त्विकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत ! : जागतिक पातळीवर केवळ स्थुलातील उपायांविषयी प्रयत्न केले जात आहेत; परंतु ते पुरेसे नाहीत. आध्यात्मिक पातळीवरही प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जीवनात आणि वातावरणात सात्त्विकता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. याच मूलभूत सिद्धांतावर प्राचीन भारतीय संस्कृती आधारलेली आहे. भारतीय ज्ञानसागरात याविषयीचे लिखित संदर्भ आढळतात.

– श्री. शॉन क्लार्क

११. प्रत्यक्ष उपाय

समाजाने सजगता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, म्हणजेच स्वतःची आणि वातावरणाची सात्त्विकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. असे झाल्यास पर्यावरणात होणार्‍या हानीकारक पालटांचे दुष्परिणाम न्यून करता येतील. सात्त्विकता वाढवण्याचा सर्वाेत्तम उपाय, म्हणजे मूलभूत तत्त्वांनुसार साधना करणे होय.

नामजप

११ अ. नामजप करणे : भगवंताचे नामस्मरण करणे, ही अत्यंत साधी आणि प्रभावी साधना आहे. नामजप केल्यामुळे व्यक्तीमधील सकारात्मकता वाढते आणि नकारात्मकता न्यून होते. नामजप मनातल्या मनात आणि अखंड करता येतो. नामजपाने मनाची शुद्धी होते आणि व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, ज्यामुळे व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरणही शुद्ध अन् सात्त्विक होण्यास साहाय्य होते.

११ आ. अग्निहोत्र करणे : प्रतिदिन घरात अग्निहोत्र केल्यामुळे घराची आणि आजूबाजूच्या परिसराची सात्त्विकता वाढते.

११ इ. समाजाची विचार करण्याची पद्धत पालटणे : वातावरण सात्त्विक होण्यासाठी समाजाची विचार करण्याची पद्धत पालटणे आवश्यक आहे. हे सहज साध्य होणार नाही. त्याला काही कालावधी लागेल; परंतु सकारात्मक परिणाम होण्यासाठी हे आवश्यक असून त्यासाठी समाजाला शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. या दिशेने एक पाऊल पुढे टाकत भारतातील केंद्रशासनाने नवीन पिढीला प्राचीन भारतीय शास्त्रांची ओळख व्हावी, या हेतूने आधुनिक शिक्षणप्रणालीमध्ये संबंधित विषयांचा समावेश केला आहे. त्यामुळे एक संपन्न वारसा पुढील पिढीला प्राप्त होणार आहे.

अग्निहोत्र

१२. ‘सीओपी २९’साठी वेगळ्या पद्धतीने विचार करणे म्हणजे काय ? 

१२ अ. ‘विचारांत पालट होणे आवश्यक आहे’, या सूत्राचे या परिषदेच्या दृष्टीने स्पष्टीकरण पाहू. जगातील सर्वाधिक आध्यात्मिक प्रदूषण कोण करत आहे ? अथवा सर्वाधिक रज-तम कोण पसरवत आहे ? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.

१२ आ. पर्यावरणातील पालटांचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी पुष्कळ धनाची आवश्यकता आहे. हे धन प्राप्त करणे, ही प्रमुख समस्या आहे. त्यावर पुष्कळ विचारविनिमय करण्यात येत आहे; परंतु ‘पर्यावरणातील पालटांविषयी कार्य करण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या धनातील किती टक्के धन समाजाला सात्त्विक जीवनशैलीचे शिक्षण देण्यासाठी दिले जाणार आहे ?’, याचा विचार व्हायला हवा; कारण समाजाला सात्त्विक जीवनशैलीचे शिक्षण दिल्याने समाजाच्या सात्त्विक जीवनशैलीमुळे वातावरणात सात्त्विकता वाढेल. परिणामी पंचमहाभूतांचे संतुलन राखले जाऊन वातावरण सामान्य राखण्यास साहाय्य होईल.

१२ इ. जगातील जे देश पर्यावरणाला सतत प्रदूषित करत रहातात आणि स्वतःच्या देशातील कार्बनचे उत्सर्जन न्यून करण्याच्या दृष्टीने कोणतेही विशेष प्रयत्न करत नाहीत, त्यांना कर्मसिद्धांत लागू पडणार आहे. त्यामुळे त्या देशाला तीव्र सामूहिक प्रारब्ध भोगावे लागणार आहे. प्रत्येक देशाच्या नेत्यांवर प्रचंड दायित्व आहे. या नेत्यांच्या योग्य वा अयोग्य निर्णयांचे परिणाम त्यांच्या संपूर्ण देशाला भोगावे लागणार आहेत.

१२ ई. देशाच्या विकासाच्या दृष्टीने साहाय्यभूत घटकांचा विचार करतांना ‘त्यात सात्त्विकता किती प्रमाणात आहे ?’, याचाही विचार होणे आवश्यक आहे. कोणत्याही शाश्वत विकासाच्या उद्दिष्टाने असात्त्विकता निर्माण होणार नाही, हे लक्षात घेऊन ते उद्दिष्ट साध्य करायला हवे. अशा मार्गाने होणारा विकास हाच खरा शाश्वत विकास आणि खरे सामायिक सामाजिक दायित्व आहे.

१३. पृथ्वीमातेच्या रक्षणाचे दायित्व पार पाडा !

पर्यावरणातील पालटाचा मोठा धोका निर्माण होऊन तो वाढत असला, तरी पर्यावरण आपल्याला आपली पृथ्वीमाता आणि एकमेकांशी असलेले आपले संबंध पुन्हा परिभाषित करण्याची (सुधारण्याची) अनोखी संधीही देतात. अगदी वाईट परिस्थितीतही काही सकारात्मक पैलू दडलेले असतात. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत कोरोना महामारी, तीव्र नैसर्गिक आपत्ती आणि युद्ध यांमुळे आपल्याला ज्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे, ते व्यर्थ गेले नाहीत. यातून बाहेर पडतांना संपूर्ण जगात याविषयी आत्मचिंतन चालू झाले असून पर्यावरणातील पालटांविषयी जागरूकता  निर्माण झाली आहे. कालचक्राने येणार्‍या पिढ्यांसाठी पृथ्वीमातेचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्या पिढीवर सोपवले आहे. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया.

‘पर्यावरणातील पालटांविषयी जागरूकता निनिर्माण  करणारी ही चळवळ गतीने पुढे जावो आणि त्यातून साधना करणारे अनेक साधक निर्माण होवोत’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !’

–  श्री. शॉन क्लार्क, फोंडा, गोवा. (नोव्हेंबर २०२४)