थोडक्यात महत्त्वाचे

१३ वेश्यांना अटक !

कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वेस्थानकाच्या भागात पोलिसांनी धाड घालून वेश्या व्यवसाय करणार्‍या १३ महिलांसह त्यांच्या ४ प्रमुखांना अटक केली. महिलांची रवानगी उल्हासनगर येथील सुधारगृहात करण्यात आली आहे.


कारागृहात २ भ्रमणभाष आढळले !

नाशिक – नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात भूमीत पुरलेले २ भ्रमणभाष आढळले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका : कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी कडेकोट सुरक्षा असतांनाही भ्रमणभाष आढळतात कसे ?


१२ जानेवारी या दिवशी प्रश्नमंजुषा स्पर्धा !

मुंबई – स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत ‘हेल्पिंग हँड फाऊंडेशन’च्या वतीने मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील शालेय अन् महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात युवा दिनाविषयी ३० प्रश्न विचारले जातील. समवेतच्या पर्यायापैकी एक पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रथम ५ स्पर्धकांना विशेष पारितोषिकाने गौरवले जाईल. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी bit.ly/4gTjeTq या लिंकवरील ‘गूगल फॉर्म’वर जाऊन १२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत नोंदवणे बंधनकारक आहे.


मुलानंतर वडिलांचीही आत्महत्या !

नांदेड – भ्रमणभाष न मिळाल्याने १७ वर्षांच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. याचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या वडिलांनी शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. मुलाने भ्रमणभाषसाठी वडिलांकडे तगादा लावला होता. (भ्रमणभाषचा हव्यास जीवघेणाच ! – संपादक)


नालासोपारा येथे स्फोट !

मुंबई – नालासोपारा येथे ‘बॉडी स्प्रे’चा (शरिरावर मारण्यात येणारे सुगंधी द्रव्य) भीषण स्फोट होऊन ४ जण गंभीर घायाळ झाले. ‘स्प्रे’वरील मुदत संपल्याचा दिनांक पालटतांना भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील ४ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.


अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्शाचालकांवर कारवाई !

नवी मुंबई – नियमापेक्षा अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्शाचालकांवर वाशी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून १३ सहस्र ५०० रुपये दंड आकारण्यात आला. यात विद्यार्थ्यांची अतिरिक्त वाहतूक करणार्‍या रिक्शाचालकांचा समावेश आहे. अतिरिक्त वाहतूक करतांना अन्य गाड्यांचा आतील प्रवाशाला धक्का लागल्यास अपघात घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवरही ही कारवाई करण्यात आली.

संपादकीय भूमिका : अतिरिक्त प्रवासी बसवून वाहतूक करतांना अपघात होऊ शकतो, याविषयी असंवेदनशील असणारे रिक्शाचालक ! नियमांना धुडकावून मनमानी करणार्‍यांवर कठोर कारवाईच हवी !