Indian-Origin MP Chandra Arya : खलिस्तान्यांवर टीका करणारे भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी केला कॅनडाच्या पंतप्रधानपदावर दावा !

खासदार चंद्रा आर्य

टोरंटो (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यागपत्र दिल्यानंतर लवकरच नवीन पंतप्रधानांची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी सत्ताधारी लिबरल पक्षाकडून नेत्याची निवड केली जाणार आहे. नव्या नेत्यांच्या सूचीमध्ये अनेकांची नावे आहेत. त्यात भारतीय वंशाच्या ३ जणांचा समावेश आहे. यातील खासदार चंद्रा आर्य यांनी आता उघडपणे पंतप्रधानपदाचा दावेदार असल्याचे घोषित केले आहे.

चंद्रा आर्य यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, अनेक कॅनेडियन, विशेषत: तरुण पिढी समस्यांना तोंड देत आहे. कष्टकरी मध्यमवर्ग आज संघर्ष करत आहे. अनेक कुटुंबे गरीब होत आहेत. कॅनडाला असे नेतृत्व हवे आहे, जे मोठे निर्णय घेण्यास घाबरत नाही. आपली अर्थव्यवस्था भक्कम करणारे, आशा पुनर्संचयित करणारे आणि सर्व कॅनेडियन लोकांसाठी समान संधी निर्माण करणारे नेतृत्व हवे आहे. मी हे दायित्व  स्वीकारण्यास आणि कॅनडाचे पुढील पंतप्रधान म्हणून नेतृत्व करण्यास उत्सुक आहे.

वर्ष २००६ मध्ये कर्नाटकातून कॅनडाला गेलेले चंद्रा आर्य हे मूळचे कर्नाटक राज्यात असलेल्या तुमकुरू येथील सिरा तालुक्यातील आहेत. आर्य यांनी ‘कौसली इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, धारवाड’ येथून एम्.बी.ए. केले आहे. वर्ष २०१५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा फेडरल निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकून संसदेत पोचले. आर्य यांनी अनेकदा खलिस्तान्यांच्या कारवायांवर टीका केली आहे.