Kala Kumbh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कुंभनगरीत कलाकुंभाचे उद्घाटन !

‘उत्तरप्रदेश दर्शन मंडपम्’चाही उद्घाटनाद्वारे शुभारंभ !

‘कलाकुंभा’चे भ‍व्य प्रवेशद्वार

प्रयागराज, १० जानेवारी (वार्ता.) – महाकुंभमेळ्याच्या आयोजनाच्या अंतर्गत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभनगरीतील सेक्टर ७ मध्ये ‘कलाकुंभ’ या भव्य प्रदर्शन दालनाचे उद्घाटन केले. याचसमवेत ‘उत्तरप्रदेश दर्शन मंडपम्’ या प्रदर्शनाचेही त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. कुंभनगरीतील सिद्धतेचा आढावा घेण्यासाठी सध्या मुख्यमंत्र्यांचा दौरा चालू आहे. त्यांच्या आगमनाच्या वेळी येथे स्थानिक कलाकारांकडून उत्तरप्रदेशातील विविध नृत्यकला सादर करण्यात आल्या. ही दोन्ही प्रदर्शने महाकुंभासाठी येणार्‍या भाविकांसाठी आकर्षणाची केंद्रे ठरणार आहेत.

‘उत्तरप्रदेश दर्शन मंडपम्’चे भव्य प्रवेशद्वार

‘उत्तरप्रदेश दर्शन मंडपम्’मध्ये उत्तरप्रदेशातील विभिन्न धार्मिक स्थळे ज्यांमध्ये अयोध्या, मथुरा, काशी इत्यादी प्रसिद्ध मंदिरांच्या लहान आकारातील प्रतिकृती सिद्ध करून लोकांना पहाण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचसमवेत ‘रामायण सर्किट’, ‘महाभारत सर्किट’, ‘कृष्ण सर्किट’ अशा स्वरूपाचे त्या त्या धार्मिक स्थळातील मंदिरांच्या छायाचित्रांचे आणि माहितीचे प्रदर्शन वेगवेगळ्या कक्षात लावण्यात आली आहेत.

‘कलाकुंभ’ हा उत्तरप्रदेशाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे भव्य चित्र आणि मूर्ती यांचे प्रदर्शन आहे. यामध्ये कुंभाच्या आयोजनाचा वर्ष १८४० पासूनचा इतिहास, हा इंग्रजांच्या काळातील कागदपत्रांच्या छायाचित्रांद्वारे मांडण्यात आला आहे. कुंभमेळ्यातील विविध व्यवस्थांचा विकास कसा झाला ? हे या छायाचित्रांद्वारे मांडण्यात आले आहे. यासह उत्तरप्रदेशाची मंदिर संस्कृती, चित्रकला, शिल्पकला आणि संगीतकला यांचे सचित्र अन् काही मूर्तींच्या रूपातील प्रदर्शनाची भव्य दालने या ठिकाणी सिद्ध करण्यात आली आहेत. मुख्य म्हणजे या दालनात छताला ‘ॐ’ आणि ‘स्वस्तिक’ यांच्या आकृत्या टांगल्या असून त्यांना दिवे जोडण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या प्रारंभीच्या परिसरात समुद्रमंथनाचे भव्य शिल्प आणि देवींची शिल्पे उभारण्यात आली आहेत. हा सर्व परिसर ५ एकरहून अधिक भागात पसरला आहे.