CM Yogi In Mahakumbh : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १३ आखाड्यांना भेट देऊन घेतला महाकुंभाचा आढावा !
योगी आदित्यनाथ यांनी संतांसमवेत भोजन करून केला संतांचा सन्मान !
महाकुंभनगरी, १० जानेवारी (वार्ता.) – येथील महाकुंभाच्या निमित्ताने प्रयागराजच्या दौर्यावर असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ जानेवारी या दिवशी महाकुंभाची अंतिम सिद्धता पाहून प्रशासकीय अधिकार्यांकडून महाकुंभाच्या कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी मोठ्या नौकेतून फिरून संगम क्षेत्रातील सिद्धतेचाही आढावा घेतला. त्यानंतर ते संतांना भेटण्यासाठी १३ आखाड्यांत जाऊन तेथील इष्ट देवतांची पूजा केली. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज यांच्याकडून त्यांनी महाकुंभ सिद्धतेविषयी माहिती घेतली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महासभामधील नाथ पंथाच्या सिंहासनाची पूजा केली.
जुना, निरंजनी, उदासीन बिग, निर्मल, ३ वैष्णव आखाडा (निर्मही, दिगंबर, निर्वानी), अग्नी, आवाहन, अटल, आनंद आखाड्यांना भेट दिली. योगी आदित्यनाथ यांनी संतांना भोजनासाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार त्यांनी संतांसमवेत रात्रीचा महाप्रसाद घेतला, तत्पूर्वी मुख्यमंत्री योगी यांनी सर्व संतांना शाल घालून त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी ‘मीडिया सेंटर’चे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून त्रिवेणी संगमासह कुंभक्षेत्राची हवाई पहाणी !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या २ दिवसांच्या प्रयागराज दौर्यावर आहेत. महाकुंभाशी संबंधित काही विकासकामांचे ते उद्घाटन करत आहेत. त्यांनी ९ जानेवारी या दिवशी दुपारी त्रिवेणी संगम आणि आजूबाजूच्या परिसराची हेलिकॉप्टरमधून हवाई पहाणी केली. या वेळी संगम क्षेत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.