Death Drone In Mahakumbh : महाकुंभक्षेत्रात ‘डेथ ड्रोन’ कार्यान्वित होणार !
प्रयागराज, ९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्रात सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. या सुरक्षाव्यवस्थेत आता अधिक कडक करण्याच्या दृष्टीने ‘डेथ ड्रोन’ कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ९ जानेवारी या दिवशी त्रिवेणी संगमावर पोलिसांकडून याचे चाचणी उड्डाण करण्यात आले. ‘डेथ ड्रोन’च्या एकूण ५ यंत्रणा पोलिसांकडून कार्यवाहीत आणण्यात येतील, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रत्येक ड्रोन ६ किमीच्या क्षेत्रातील सुरक्षाव्यवस्था सांभाळू शकेल. २० दिवसांपूर्वीच कुंभक्षेत्रात ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. विनाअनुमती उडवण्यात येणारे ड्रोन या यंत्रणेद्वारे पाडण्यात येणार असून अद्याप असे २ ड्रोन पाडण्यात आले आहेत.
काय आहे ही ड्रोन प्रणाली ?
सध्याच्या ‘डेथ ड्रोन’द्वारे ६ किलोमीटरपर्यंतच्या भागावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. याद्वारे ६ किमीच्या क्षेत्रात या ड्रोनच्या कार्यकक्षेत येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्याची नोंद करण्यात येणार आहे. या चेहर्याची नोंद झाल्यानंतर त्याची माहिती संबंधित पोलीस यंत्रणेकडे जाईल. हे ड्रोन प्रत्येक सेक्टरमधील सीसीटीव्ही कॅमेर्यांशी संलग्न असतील. एखादी व्यक्ती संशयास्पद हालचाली करतांना आढळली, तर त्याची माहिती या यंत्रणेला जाऊन ती व्यक्ती कुंभक्षेत्रात कुठेही असली, तरी तिच्यावर लक्ष्य ठेवले जाईल आणि काही गैरकृत्य होत असेल, तर तिचा माग काढून पोलीस तिच्यावर कारवाई करू शकतील. यामध्ये एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याद्वारेही जेवढे लोक कुंभक्षेत्रात येतील, त्यांची डोक्यांच्या संख्येची (एकूण संख्या) नोंद करण्यात येईल.