पुणे येथे ‘सारथी योजने’त घोटाळा !
घोटाळ्यात खासगी शिकवणीवर्गांना विद्यार्थी आणि अधिकारी यांचीही साथ असल्याचा आरोप !
पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक साहाय्य केले जाते. ‘सारथी’ संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार खासगी शिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी’कडून देण्यात येते. या योजनेत पुण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
१. पुण्यातील खासगी शिकवणीवर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये बनावट नोंदी करून शासकीय निधीची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
२. सामाजिक कार्यकर्ते आणि अधिवक्ता अशोक बेडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी तक्रार प्रविष्ट केली आहे.
३. सारथीकडून नेमलेल्या अधिकार्यांनी शिकवणीवर्गाची योग्य पडताळणी केली नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा आरोप बेडे यांनी केला आहे.
४. बनावट नोंदीसाठी टेलिग्रामवर एक गट सिद्ध करण्यात आला आहे. पडताळणीच्या वेळी विशिष्ट खुणा करून मुलांना बोलावले जाते. ‘डबल आयडी’द्वारे फसवणूक केली जात आहे.
५. सारथीने शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी १२ खासगी शिकवणीवर्गांना नियुक्त केले होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची ७५ टक्क्यांची अट पूर्ण करण्यासाठी खासगी शिकवणीवर्गाने एका विद्यार्थ्याच्या नावावर २ ‘बायोमेट्रिक आयडी’ सिद्ध केले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची बनावट नोंद दाखवून अनुदानाचा अपवापर करण्यात आल्याचाही आरोप आहे.
संपादकीय भूमिका :या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामध्ये सामील असलेल्या अधिकार्यांपासून खासगी शिकवणी वर्गांपर्यंत सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी ! |