छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापासून रोखणारे तुम्ही कोण ? – श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा कर्नाटक सरकारला प्रश्न !
सातारा – छत्रपती शिवाजी महाराज आणि लहानग्या शंभूराजे यांना औरंगजेब आगर्याच्या कैदेतून रोखू शकला नाही. आज ३५० वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘भीम पराक्रम’ सर्वज्ञात आहे. छत्रपतींविषयीचे प्रेम प्रत्येकाच्या नसानसांत भिनले आहे. औरंगजेब छत्रपतींना रोखू शकला नाही; मग छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापासून रोखणारे तुम्ही कोण ? असा परखड प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कर्नाटक सरकारला विचारला. अनगोळ (जिल्हा बेळगाव) येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. कर्नाटक सरकारने पुतळा उभारण्याला आडकाठी आणली होती.
या वेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करण्यात आला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही दैवी शक्ती होती. त्यामुळेच आजही अनेकांना पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, असे वाटते. कर्नाटकच्या प्रशासनालाही हीच अपेक्षा असावी. छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचे नव्हते, तर ते अठरापगड जातींचे होते. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.’’