‘पंतप्रधान आवास योजने’च्या अंतर्गत महापालिका करणार ३०० कोटी रुपये खर्च !
पुणे – ‘पंतप्रधान आवास योजने’च्या अंतर्गत प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, यासाठी पुणे महापालिकेने दुसर्या टप्प्यात धानोरी, हडपसर, बाणेर, कोंढवा, बालेवाडी आणि वडगाव खुर्द या भागांत ४ सहस्र १७३ घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. इच्छुकांची नावनोंदणी चालू केली आहे. शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना अल्प व्ययात हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र शासनाने ही योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात वडगाव बुद्रुक, खराडी, हडपसर या भागांत २ सहस्र ९१८ घरे बांधली. यासाठी नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून शहानिशा करून घराचे वाटप केले आहे. पहिल्या टप्प्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजना-२’ची घोषणा केली. आता ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी चालू झाली आहे.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले की, महापालिकेच्या जागेवर घरे बांधल्याने भूमीचा खर्च अल्प येतो. त्यामुळे अल्प खर्चात घरे देणे शक्य होते. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल.