सावित्रीबाई फुलेंच्या चरित्र ग्रंथातील फातिमा शेख हे पात्र इतिहासात कधीच नव्हते ! – दिलीप मंडल, सल्लागार, माहिती प्रसारण मंत्रालय, केंद्र सरकार
केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांचे वक्तव्य
पुणे – सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रग्रंथात कुठेही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही. फातिमा शेख हे कपोलकल्पित पात्र आहे, असे केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांनी म्हटले आहे, तर दुसरीकडे फातिमा शेख यांचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये आढळल्याचा दावाही केला जातो. हे पात्र इतिहासात असल्याचे सांगितले जाते. त्याचसह फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांना साहाय्य केल्याचे सांगितले जाते.
काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार शर्मिला रेगे यांनी महाराष्ट्रामध्ये यावर पूर्वी काम केलेले आहे. त्यांच्या लिखाणामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख आहे. जे.एन्.यू.चे प्राध्यापक डॉ. मिलिंद आव्हाड यांनी सांगितले की, १९८० पासून फातिमा शेख यांची चर्चा आहे आणि महात्मा फुले यांच्या गौरव ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेखही आहे.
काय म्हणाले दिलीप मंडल ?
दिलीप मंडल यांनी २०१९-२०२० मध्ये काही लेख लिहिले होते, त्यामध्ये फातिमा शेख यांचा उल्लेख केला गेला होता. सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्यासह फातिमा शेख यांचेही काम होते आणि फातिमा शेख यांनी शाळा चालवण्यामध्ये सहकार्य केले, असा उल्लेख त्यांच्याकडून वारंवार केला गेला होता. त्यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर ९ जानेवारीला दिलीप मंडल यांनी एक पोस्ट प्रसारित केली. यामध्ये त्यांनी फातिमा शेख यांचे पात्र हे त्यांनी उभे केले. फातिमा शेख यांचा पूर्णपणे उल्लेख कुठेही, सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या लिखाणामध्ये किंवा जीवनामध्ये आढळत नाही. त्यांच्याविषयी जे जीवनचरित्र लिहिले गेले, त्यामध्येही फातिमा शेख यांचा उल्लेख नाही. फातिमा शेख हे मी सिद्ध केलेले पात्र होते असे त्यांनी म्हटले आहे.