उत्तर गोवा समुद्रकिनारपट्टीतील ‘शॅक’ मध्यरात्री बंद करण्याचा पोलिसांचा आदेश

शॅकच्या कर्मचार्‍यांनी पर्यटकांना मारहाण केल्याचे प्रकरण

(‘शॅक’ म्हणजे समुद्रकिनार्‍यावरील खाद्यपदार्थ आणि मद्यविक्री यांचे दुकान)

म्हापसा, ९ जानेवारी (वार्ता.) – पोलिसांनी कांदोळी, कळंगुट आणि मांद्रे समुद्रकिनार्‍यांवरील सर्व ‘शॅक’ मध्यरात्री १२ वाजल्यानंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हल्लीच ‘शॅक’च्या कर्मचार्‍यांनी पर्यटकांना मारहाण करण्याच्या अनेक घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी हा आदेश दिला आहे. पोलिसांनी या आदेशाची कार्यवाही कठोरपणेे चालू केल्याने उपरोल्लेखित ३ समुद्रकिनारपट्टीतील २३६ ‘शॅक’
मध्यरात्रीनंतर बंद करण्यात आले आहेत.

‘शॅक’ रात्री १ वाजपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती असतांना ते मध्यरात्री १२ वाजता बंद करण्याच्या पोलिसांच्या आदेशाविषयी ‘शॅक’मालक संघटने’ने प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे; मात्र पोलिसांच्या मते हा आदेश ‘शॅक धोरणा’नुसार, तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी देण्यात आला आहे. हल्लीच कळंगुट येथील एका ‘शॅक’चा मालक आणि तेथील कर्मचारी यांनी केलेल्या मारहाणीत एका पर्यटकाचा मृत्यू झाला
होता, तसेच पर्यटकांना मारहाण करण्याच्या अशाच स्वरूपाच्या घटना मांद्रे आणि कांदोळी समुद्रकिनार्‍यांवरही घडलेल्या आहेत. या घटनांनंतर पोलीस ‘शॅक’ मध्यरात्रीनंतर बंद झाल्यावर ‘समुद्रकिनार्‍यांवर कुणी मद्य प्यायला बसलेले नाहीत ना ?’, याची निश्‍चिती करत आहेत. वास्तविक कळंगुट येथे ‘शॅक’चालकांकडून पर्यटकावर झालेल्या जीवघेण्या आक्रमणानंतर उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्शत
कौशल यांनी कांदोळी, कळंगुट आणि मांद्रे येथील ‘शॅक’ रात्री ११ वाजता बंद करण्याचा आदेश दिला होता; मात्र स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून ‘शॅक’ बंद करण्याची वेळ मध्यरात्री १२ वाजता करण्यात आली.

आम्हाला क्षमा करा, पर्यटकांना मारहाण करण्याच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही ! – अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे महासचिव जॉन लोब

अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे महासचिव जॉन लोब यांनी मागील काही दिवसांत मारहाणीच्या घटनांवरून ‘सर्व ‘शॅक’चालकांच्या वतीने पर्यटक आणि स्थानिक यांची क्षमा मागितली आहे अन् मारहाणीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नसल्याचे आश्‍वासन दिले आहे.

संपादकीय भूमिका

शॅक मध्यरात्री बंद करायला सांगितल्यावर क्षमा मागणारे गोवा शॅकमालक संघटनेचे महासचिव !