धार्मिक भावना दुखावणारे दत्ता नायक यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
न्यायालय जामीन अर्जावर १० जानेवारीला देणार निकाल
मडगाव, ९ जानेवारी (वार्ता.) – धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेले मडगाव येथील उद्योजक तथा साहित्यिक दत्ता दामोदर नायक यांचा अंतरिम जामीन अर्ज मडगाव सत्र न्यायालयाने ९ जानेवारी या दिवशी फेटाळला आहे. न्यायालयाने १० जानेवारीसाठी निकाल राखून ठेवला आहे. काणकोण पोलिसांनी दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम २९९ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
काणकोण येथील सतीश भट यांनी प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंद झालेला आहे. धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी दत्ता नायक यांच्या विरोधात आतापर्यंत पणजी, मडगाव, डिचोली, वास्को आणि फोंडा येथे विविध संघटनांकडून तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
न्यायालयात कोण काय म्हणाले ?
(म्हणे) ‘धार्मिक संस्थांची नावे आणि ‘लुटारू’ हे शब्द विधानामध्ये अजाणतेपणे उच्चारले !’ – दत्ता नायक
दत्ता दामोदर नायक यांनी यापूर्वीही हिंदु धर्मातील देवता आणि हिंदु धर्मीय यांच्या विरोधात वक्तव्ये केली आहेत. दक्षिणायनच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या प्रत्येक कार्यक्रमात हिंदुत्वनिष्ठांना हिणवले जाते. बोरी येथील एका कार्यक्रमात देवतांविषयी असे वक्तव्य करायचा प्रयत्न करतांना त्यांना तेथील लोकांनी समज दिली होती. अशी पार्श्वभूमी असलेेले दत्ता दामोदर नायक यांनी ‘अजाणतेपणे विधाने केली’, असे म्हणणे हा खोटारडेपणा आहे.
हिंदुत्वनिष्ठांनी दत्ता दामोदर नायक यांनी यापूर्वी हिंदु धर्माच्या विरोधात लिहिलेले लेख, वक्तव्ये आदींचे संकलन करून पुरावा म्हणून पोलिसांना द्यावे. काणकोण पोलिसांनी दत्ता नायक यांच्या जामिनाला विरोध करतांना न्यायालयात म्हटले की, दत्ता नायक यांच्या विधानामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि यामुळे दत्ता नायक यांना कह्यात घेऊन याविषयी पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. दत्ता नायक यांची बाजू मांडतांना अधिवक्ता क्लिओफात आल्मेदा म्हणाले, ‘‘याचिकादार दत्ता नायक यांनी मान्य केले आहे की, त्यांच्या विधानात धार्मिक संस्थांची नावे आणि ‘लुटारू’ हा शब्द असायला नको होते. हे शब्द त्यांनी अजाणतेपणाने उच्चारले. यामुळे या प्रकरणी केवळ अवमान झालेला आहे, तर भारतीय न्याय संहितेचे कलम २९९ किंवा २९५ (अ) अंतर्गत गुन्हा झालेला नाही.’’