बांगलादेशी सैनिकांनी भारतीय सैनिकांशी वाद घातल्यावर गावकरी कोयते, दंडुके घेऊन पोचल्याने बांगलादेशी सैनिक पळाले !

भारत-बांगलादेश सीमेवरील घटना

मालदा (बंगाल) – बंगालच्या मालदा जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवर तणावाचा प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. सीमा सुरक्षा दलाचे सैनिक भारतीय सीमेमध्ये कुंपण घालण्याचे काम करत असतांना त्याला बांगलादेशाच्या सैन्याने आक्षेप घेतला. यामुळे दोन्ही सैन्यांत वाद चालू झाला. याची माहिती येथील सुकदेवपूरच्या गावकर्‍यांना समजली आणि ते कोयता, मोठेे सुरे आणि दंडुके घेऊन सीमेवर पोचले. भारतीय नागरिकांचे रौद्ररूप पाहून बांगलादेशी सैनिक घाबरले आणि त्यांनी तेथून पलायन केले. या वेळी गावकर्‍यांनी ‘भारत माता की जय’, ‘वन्दे मातरम्’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.

सीमेवर कुंपण घालण्याच्या प्रकल्पाला दोन्ही देशांनी यापूर्वीच संमती दिली होती. तरीही बांगलादेशी सैनिक त्याला विरोध करण्यासाठी आले होते. सीमा सुरक्षा दलाने अधिकारी पातळीवर बांगलादेशाला या वादाची कल्पना दिली. यानंतर हा वाद मिटवण्यात आला. भाजपचे बंगालमधील आमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी सैन्याची क्षमता भारतासमोर नगण्य असतांनाही अशा प्रकारे भारतीय सैन्याला डिवचण्याचा प्रयत्न का केला जात आहे, हे लक्षात घेता भारताने आता आक्रमक होणे अत्यंत आवश्यक झाले आहे !