पत्नी : पुरुषाचा खरा मित्र आणि सखा !
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
प्रश्न : किं स्वित् मित्रं गृहे सतः ? किं स्वित् दैवकृतः सखा ?
अर्थ : गृहस्थाचा मित्र कोण ? माणसाला देवाने दिलेला आणि दैवाने लाभलेला सखा कोण ?
उत्तर : भार्या.
यक्षाने दोन प्रश्न विचारले; पण युधिष्ठिराने दोन्ही वेळा एकच उत्तर दिले. पत्नी हीच पुरुषाची खरी मित्र आणि सखा आहे. मित्र शब्दांतील अर्थापेक्षा ‘सखा’ शब्दातील अर्थ अधिक जवळचा आणि गंभीर आहे. ‘जीवलग, जीवश्च-कंठश्च आणि अभिन्नहृदय मित्र, देह दोन; पण जीव, प्राण एक, असे ज्यांच्याविषयी म्हणता येईल, असा मित्र होय’, हा अर्थ सखा या शब्दातून व्यक्त होतो. विवाहात जे मंत्र आहेत, त्यात सप्तपदीच्या वेळी सातवे पाऊल टाकतांना ‘सखा सप्तपदी भव’, असा मंत्र आहे. वर वधूला म्हणतो, ‘आपण ७ पावले चाललो. तू आता माझी सखा.’ सेवक आणि दासी झाली, असे म्हणत नाही.
१. महर्षि मनूने स्त्रीविषयी व्यक्त केलेला आदरभाव
मनूने एकदा केव्हा तरी ‘न स्त्री स्वातन्त्र्यमर्हति ।’ (मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३), म्हणजे ‘स्त्री सुरक्षित नाही, अशी स्थिती कधी असू नये’, असे म्हटले, तर त्याचा संदर्भ आणि आशय लक्षात न घेता सुधारक म्हणवणारे स्त्री-पुरुष मनूला स्त्रियांचा शत्रू समजून सदैव झोडून काढत असतात. गृहस्थ धर्माच्या दृष्टीने स्त्रीला ‘पत्नी’ या नात्याने अत्यंत श्रेष्ठ स्थान मनूने दिले आहे. मनू म्हणतो,
‘अर्धं भार्यां मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ।।
– महाभारत, पर्व १, अध्याय ६८, श्लोक ४०
अर्थ : स्त्री हे पुरुषाचे अर्धे शरीर आहे. पत्नी हा सर्वश्रेष्ठ सखा आहे. स्त्रीमुळे धर्म, अर्थ आणि काम साधतात. मरणार्यालाही स्त्री हीच मित्र असते.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
– मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ५६
अर्थ : जिथे नारीची पूजा होते, तेथे देवता रममाण होतात.’
मनू म्हणतो, ‘स्त्रीचा छळ होऊन तिचे अश्रू भूमीवर पडले, तर दारिद्र्य येते, घराला अवकळा येते.’ तेव्हा धर्मशास्त्राने ‘स्त्रियांचा छळ करावा, त्यांना दासी म्हणून वागवावे’, असा आदेश दिलेला नाही. तसे कुठे घडत असेल, तर तो दोष त्या त्या व्यक्तीचा आहे.
२. धर्मशास्त्राने स्त्रियांना दिलेली वागणूक आणि आताच्या स्त्रीमुक्तीवाल्यांनी केलेली आबाळ
आपल्या परंपरेने श्रमविभागणीच्या तत्त्वावर ‘स्त्रियांनी घर सांभाळावे, पुरुषांनी बाहेरचे पहावे’, अशी विभागणी सुचवली आहे. स्त्री शरिरातील वैशिष्ट्य आणि तिच्या नैसर्गिकपणे असलेल्या कार्यामुळे ही विभागणी सोयीचीही आहे. ती अमान्य करायची असेल, तर तिचे परिणामही भोगायला सिद्ध झाले पाहिजे. ‘मुलाबाळांची आबाळ होणार नाही आणि कुटुंबव्यवस्था टिकून राहील’, या दोन्ही गोष्टी योग्य रितीने सांभाळून ‘कसे वागावे’, हे विवेकपूर्वक ठरवले पाहिजे. यात बिघाड झाला, तर माणसाचे माणूसपण नष्ट होईल. समाजाचे समाजपण हरपेल. त्याला कळपाची कळा येईल. स्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पनेतून पती-पत्नी हे नातेच नष्ट झाले आणि काही देशांतून एका माणसाची कुटुंबे नांदू लागली. ‘मुले होऊ नयेत, झाली तर शासनाने सांभाळावीत’, हा स्वैराचार व्यक्तीशः सुखावह वाटला; पण त्याचे परिणाम भयंकर दिसू लागले. माणुसकी दुरावली, मुलांमध्ये बालवयातच अपराधी प्रवृत्ती वाढली आणि मुले हिंसक कृत्ये करू लागली. आता त्या देशाने पती-पत्नीच्या नात्याने स्त्री-पुरुष एकत्र रहातील, तर त्यांना अधिक वेतन आणि सुखसोयी देण्याचे ठरवले. त्याचा उपयोग होऊन घराला घरपण कितपत आले कुणास ठाऊक ? कोसळण्याला वेळ लागत नाही; पण उभारणीला फार वेळ लागतो. ‘स्त्रीमुक्तीची चळवळ हे लक्षात घेईल’, तर बरे होईल.
स्त्रियांना काही सोसावे लागते हे खरे; पण केवळ स्त्रियांनाच सोसावे लागते, हे तितकेसे खरे नाही. पुरुषांनाही सोसावे लागते. स्त्रिया बोलतात आणि त्यांना सहानुभूती मिळते. पुरुषाला स्वतःचे दुःख प्रगट करण्याची लाज वाटते. क्वचित् त्याने प्रगट केलेच, तर त्यालाच समाजाकडून अवहेलना सोसावी लागते. स्त्रीमुक्ती आंदोलनाप्रमाणे पुरुषमुक्ती चळवळही आरंभ केलेली आहे, अशी वार्ता ऐकिवात येते. धर्मशास्त्राने स्त्रियांना अपमानास्पद रितीने वागवले नाही.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)