सागरी सुरक्षेसाठी ‘ड्रोन’प्रणाली विकसित करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री
|
मुंबई – समुद्रकिनारा लाभलेल्या राज्यांपैकी ‘ड्रोन’द्वारे देखरेख ठेवणारी प्रणाली विकसित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. ‘ड्रोन’प्रणालीमुळे राज्यातील ७ जिल्ह्यांतील ९ सागरी किनार्यांची सुरक्षा आणखी भक्कम होणार आहे. यामुळे सागरी सुरक्षेसह अवैधरित्या होणार्या मासेमारीवरही नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे, असे राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी येथील सांगितले.
राज्यातील सागरी क्षेत्रात होणारी अवैध मासेमारी, तसेच घुसखोरी रोखण्यासाठी ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे. यासाठीच्या विशेष प्रणालीचा शुभारंभ ९ जानेवारी या दिवशी येथील मत्स्य आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मंत्री राणे यांच्या हस्ते ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात आला. यासाठी मत्स्य आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उभारण्यात आला आहे.
आज आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय येथे ‘डिजिटल डेटा मेंटेनंन्स यंत्रप्राणाली नियंत्रण कक्ष’ उद्घाटन कार्यक्रम पार पडला. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोन प्रणाली राबवण्यात आली. यामुळे ड्रोनच्या साहाय्याने सागरी… pic.twitter.com/1ZeVARgqz5
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 9, 2025
या प्रणालीचे उद्घाटन झाल्यानंतर राज्यातील शिरगाव (जिल्हा पालघर), उत्तन (जिल्हा ठाणे), गोराई (जिल्हा मुंबई उपनगर ), ससून गोदी (जिल्हा मुंबई शहर), रेवदंडा आणि श्रीवर्धन (जिल्हा रायगड), मिरकरवाडा आणि साखरी नाटे (जिल्हा रत्नागिरी) अन् देवगड (जिल्हा सिंधुदुर्ग) या ९ ठिकाणच्या समुद्र किनार्यांवरून ड्रोन उडवून प्रात्यक्षिक करण्यात आले.
या कार्यक्रमात मंत्री राणे पुढे म्हणाले, ‘‘या यंत्रणेमुळे राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या सागरी किनार्यावरून राज्याच्या १२ मैल सागरी सीमेपर्यंत अवैधरित्या मासेमारी करणार्या नौकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अशा अनधिकृत नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ‘ड्रोन वेब सोल्युशन्स स्ट्रिमिंग’चा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा बसून स्थानिक मासेमारांची होणारी हानी, उत्पन्नात होणारी घट आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. एका दिवसात १२० सागरी मैल क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच एका दिवसात ६ घंटे सर्वेक्षण करणे बंधनकारक आहे.’’
आज आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, नरिमन पॉइंट येथे ‘डिजिटल डेटा मेंटेनंन्स यंत्रप्राणाली नियंत्रण कक्ष’ उद्घाटन कार्यक्रम पार पडला. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोन प्रणाली राबवण्यात आली. यामुळे ड्रोनच्या… pic.twitter.com/2OgB58yXpU
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 9, 2025
उद्घाटनप्रसंगी ‘ड्रोन’प्रणाली कशी कार्य करते ?’ याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वेळी मुंबई येथे संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्षरित्या, तर उर्वरित ठिकाणचे अधिकारी दूरदृश्य संवाद (व्हिडिओ कॉन्फरन्स) प्रणालीद्वारे उपस्थित होते.