नाम घेण्यानेच भगवंताचे उतराई होता येईल !
एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते. पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. ते श्रीमहाराजांच्या (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या) दर्शनास आले असता म्हणाले, ‘महाराज, माझ्या अपेक्षेपलीकडे माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली, यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन ?’ हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज फार प्रसन्न झाले आणि त्यांना म्हणाले, ‘आपल्यावर ज्याने उपकार केले, त्याच्याजवळ जी वस्तू नाही ती त्याला देणे, म्हणजेच खर्या अर्थाने उतराई होणे होय. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताची असल्याने दृश्य वस्तू त्याला देणे, म्हणजे त्याचेच त्याला दिल्यासारखे घडते. त्याच्यापाशी जे नाही ते त्याला देणे योग्य आहे. त्याच्यापाशी नाही, अशी एकच वस्तू आहे. ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले, म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणागती साधण्यास ‘मी कुणी नाही’, ही भावना निर्माण झाली पाहिजे. नामस्मरणाने ती निर्माण होते; म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)