संपादकीय : अधिक लाभाचा हव्यास !
महाराष्ट्रातील मुंबई, कल्याण, ठाणे अशा वेगवेगळ्या भागांत ‘टोरेस’ नावाने शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिरे यांचे दागिने विकणार्या आस्थापनाने १ लाखापेक्षा अधिक लोकांची ४ सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक फसवणूक करत गाशा गुंडाळला आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये चालू झालेल्या या आस्थापनाने लोकांना ४ टक्के, १० टक्के, १४ टक्के ते अगदी काहींना २४ टक्के इतका प्रचंड परतावा दिला. इतकेच नाही, तर ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून आमीष दाखवत काहींना चारचाकी गाडी आणि घरेही देण्यात आली. या आस्थापनाने अधिकाधिक लोकांना रोख रक्कम गुंतवल्यास अधिक लाभाच्या परताव्याचे आमीष दाखवले आणि लोकांनी कोणताही विचार न करता आंधळेपणाने त्यात पैसे गुंतवले. यात अगदी भाजीवाल्यापासून ते अनेक सामान्यांनी त्यांच्या आयुष्यभराची मिळवलेली पुंजी गुंतवली, जी परत मिळण्याची आशा आता धूसरच आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने पावले उचलत आस्थापनाच्या ३ वरिष्ठ अधिकार्यांना अटक केली आहे; मात्र या घोटाळ्याचे खरे सूत्रधार असणारे २ संस्थापक जॉन कार्डर आणि व्हिक्टोरिया कोवलेन्को हे युक्रेनला पसार झाल्याची माहिती समोर येत आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जवळपास प्रत्येक राज्यातील जिल्हा, तालुका आणि गावपातळीपर्यंत अल्प कालावधीत अधिक परतावा देणारी आस्थापने अन् त्यांद्वारे होणारे शेकडो घोटाळे समोर आले आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘हायबॉक्स स्कॅम’नावाचा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. या ‘ॲप’मध्ये पैसे गुंतवल्यास प्रतिदिन १ ते ५ टक्के म्हणजे महिन्याला ३० ते ९० टक्के व्याज मिळेल, असे आमीष दाखवण्यात आले. प्रारंभी काहींना परतावा दिलाही; मात्र फेब्रुवारी २०२४ पासून त्यांनी विविध कारणे सांगून पैसे देणेच बंद केले. यात ३० सहस्र लोकांचे पैसे बुडाले. यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे या ‘ॲप’चे विज्ञापन एल्विश यादव यांसह काही नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री यांनीही केले होते. बीड येथील ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळा हा अशांपैकीच एक असून ३ लाख ७० सहस्र ठेवीदारांचे ३ सहस्र ७०० कोटी रुपये यांत अडकले आहेत. दुर्दैवाने शेकडो घोटाळे उघडकीस येऊन लाखो सामान्य नागरिकांचे पैसे बुडत असूनही परत नवीन घोटाळे होतच आहेत आणि याला कुठेच फारसा अंकुश नाही कि कुणालाही शिक्षा झाली, असे दिसत नाही.
वर्ष १९९४ पासून हर्षद मेहता याच्यापासून चालू झालेला ते मधल्या काळातील अब्जावधी रुपये घेऊन परदेशात पसार असलेले मेहूल चोक्सी, नीरव मोदी यांपैकी अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच लोकांना घोटाळा, गैरव्यवहार यांत शिक्षा झाली. पूर्वी नोंद झालेले खटले जलद गती न्यायालयात चालले आणि त्यांतील भ्रष्टाचारी लोकांना तात्काळ कठोर शिक्षा झाली, तरच काही प्रमाणात अशा प्रकारांना आळा बसेल. हिंदु धर्म मानवाला संयम शिकवतो, आवश्यक तेवढेच धन योग्य मार्गाने मिळवावे, हेही शिकवतो; मात्र याचे योग्य शिक्षणच मिळत नसल्याने अन् कलीच्या प्रभावामुळे मनुष्य सातत्याने अधिक धनाच्या हव्यासाकडेच धाव घेतो. त्यामुळे भारतियांनीही आता ‘अशा आस्थापनांच्या मागे धावून स्वतःचे आयुष्य पणाला लावायचे का ?’, हा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे.
विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करणार्या गुन्हेगारांना तात्काळ शिक्षा झाली, तरच समाजातील फसवणुकीचे प्रकार थांबतील ! |