पुणे येथे रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांकडून रुग्णालयात तोडफोड !
६ जणांविरोधात गुन्हा नोंद; ३ महिलांचा समावेश
पुणे – रुग्णाच्या मृत्यूला रुग्णालय उत्तरदायी असल्याचे कारण देत भारती रुग्णालयात तोडफोड करून कर्मचार्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी आधुनिक वैद्य अंकिता ग्रोवर यांनी ६ जणांविरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे. त्यात ३ महिलांचाही समावेश आहे. ही घटना ७ जानेवारी या दिवशी घडली.
रुग्णालयात तेजराज जैन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ‘रुग्णालयाच्या दायित्वशून्यतेमुळे जैन यांचा मृत्यू झाला’, असा आरोप करून नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. नातलगांनी सुरक्षारक्षक आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की केली. लाकडी आसंदी काचेवर फेकून काच फोडण्यात आली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी नातलगांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.