संपादकीय : जागतिक अशांतीसाठी पुरस्कार !
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची २० जानेवारीपर्यंत अमेरिकेत सत्ता रहाणार आहे. याचा लाभ उठवत बायडेन यांनी जगात अशांतता पसरवणार्यांपैकी काहींना अमेरिकेचा सर्वाेच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यामध्ये भारतद्वेष्टे जॉर्ज सोरोस यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे अब्जाधीश असलेले जॉर्ज सोरोस हे ‘डीप स्टेट’ या धोकादायक जाळ्याचा एक भाग आहेत. जगाच्या पाठीवरील सर्वच देशांचे सरकार, त्या देशाची अर्थव्यवस्था, प्रशासन, माहिती आणि प्रसारण सगळे काही स्वतःच्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न अमेरिकेतील ‘डीप स्टेट’कडून होत असतो. भारतातील नरेंद्र मोदी यांचे सरकार विसर्जित व्हावे, यासाठी सोरोस यांनी १ बिलियन डॉलर्सचा निधी राखून ठेवला होता. त्यांनी स्वतःच हे उघडपणे सांगितले होते. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार असतांना सैन्यप्रमुख जनरल अझीझ अहमद यांच्यावरही ‘बांगलादेशात भ्रष्टाचार केला’, असे आरोप अमेरिकेने केले होते. यामागेही जॉर्ज सोरोस होते. ‘बांगलादेशातील लोकशाही आणि कायद्याचे राज्य यांसाठी आपण हे करत आहोत’, अशी मखलाशी अमेरिकेने केली होती आणि नंतर बांगलादेशातील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार कसे उलथवले गेले, ते सार्या जगाने पाहिले. त्यामुळे बायडेन यांनी अमेरिकेचा प्रतिष्ठित ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ जॉर्ज सोरोस आणि अन्य काही डीप स्टेटचे हस्तक यांना दिला असून ‘जागतिक अशांती निर्माण करण्यासाठीच हा पुरस्कार दिला जात आहे’, असे म्हणण्यात चूक काही नाही.
एकूणच सत्तेवरून पायउतार होण्यापूर्वी जमेल तेवढे ट्रम्पविरोधी आणि भारतविरोधी कारस्थाने करण्याचा चंग जो बायडेन यांनी बांधला आहे. ‘प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ हा पुरस्कार जागतिक शांततेसाठी कार्य करणार्यांना, तसेच ज्यांनी अमेरिकेसाठी आणि जगासाठी असामान्य योगदान दिले आहे, त्यांना दिला जातो, असे सांगितले जाते; परंतु सध्या तो जागतिक अशांती निर्माण करणारे जॉर्ज सोरोस यांनाच दिला गेला आहे. अमेरिकेला जगावर स्वतःची मक्तेदारी हवी असते. त्यामुळे अशांना पुरस्कार दिला जातो. जेव्हापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत, तेव्हापासून जगात भारताचा दबदबा निर्माण होत आहे. मोदी जगात लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे भारत अमेरिकेच्या मक्तेदारीला आव्हान ठरत आहे. जगभरात नरेंद्र मोदी यांना मिळणारा आदर आणि प्रतिष्ठा कुणाला सहन होत नसेल, तर ते देश म्हणजे प्रामुख्याने अमेरिका, चीन, ब्रिटन, कॅनडा, पाकिस्तान आणि आताचा महंमद युनूस यांचा बांगलादेश हे आहेत. अमेरिकेने किंवा वॉशिंग्टन पोस्ट यांनी केलेल्या आरोपांनाही भारताने भीक घातलेली नाही. उलट भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी भारतावरील आरोपांचे वेळोवेळी प्रखर शब्दांत खंडण केले आहे. या गोष्टी अमेरिकेला सहन झालेल्या नाहीत. त्यामुळे देशात सत्तांतर घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेली मोदी सरकारची अपकीर्ती, त्यासाठी जॉर्ज सोरोस यांनी पेरलेला पैसा, हा त्याचाच एक भाग होता. त्याला यश मिळाले नाहीच आणि नंतर जो बायडेन यांचे सरकारही गडगडले, ही नियतीची लीला होती. भारतात गृहयुद्ध होण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. भारतियांनी ‘डीप स्टेट’चे भारताविरुद्धचे हे षड्यंत्र जाणणे आवश्यक असून या ‘डीप स्टेट’ला साहाय्य करणारे राहुल गांधी आणि अन्य यांना धडा शिकवणे आवश्यक आहे.