ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम ‘प्रेमा’चे झणझणीत अंजन घालणारा ब्रिटीश लेखक डग्लस मरे !
गेल्या आठवड्यात डग्लस मरे या ब्रिटीश लेखकाचे ‘द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप’ हे पुस्तक वाचायला प्रारंभ केला. हे पुस्तक वाचत असतांना इंटरनेटवर डग्लस मरे यांच्याच ‘इस्लामोफिलिया’ (Islamophilia – इस्लामची आवड) या विचित्र नावाच्या पुस्तकाने लक्ष वेधून घेतले. ‘इस्लामोफिलिया’ वरवर पहात असतांना ते एवढे आवडले की, आधी तेच वाचून पूर्ण करायचे ठरवले.
जगभरातील साम्यवादी पुरोगामी माध्यमे, तथाकथित इंटरनेटच्या माध्यमातून झालेले विद्वान (इंटरनेट इंटेलेक्च्युअल्स), हॉलीवूड इत्यादींमुळे आपण ‘इस्लामोफोबिया’ (इस्लामविषयीची भीती) या शब्दाशी एव्हाना परिचित झालेलो असतो; पण हे इस्लामविषयीचे ‘फिलिया’ हा काय प्रकार आहे, हे मला कळेना. फिलिया म्हणजे आवड. पुस्तकप्रेमींसाठी वापरली जाणारी संज्ञा, म्हणजे ‘बिबलीयोफिलिया’ किंवा लहान मुलांची ‘आवड’ असणार्या आणि त्यांच्याकडे आकर्षित होणार्या प्रौढ लोकांसाठी वापरली जाणारी ‘पॅडोफिले’ ही संज्ञा ही याची काही उदाहरणे.
१. ‘इस्लामोफोब’ म्हणजे काय ?
‘इस्लामोफिलिया’ हे अगदी छोटेसे पुस्तक आहे. जेमतेम ७५ ते ८० पानी. त्यात डग्लस मरे आपल्याला आधी ‘इस्लामोफोबिया’ या शब्दाचा अर्थ थोडक्यात समजावून सांगतो. आधुनिक जगातील वैचारिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी मूलभूत तत्त्वांना नाकारणारर्या ७ व्या शतकातील इस्लामी (अ) विचारधारेला विरोध करणारे संतुलित विचारांचे लोक, म्हणजे ‘इस्लामोफोब’ ही साधी सोपी जगन्मान्य व्याख्या. आता पुढे जाऊन मरे म्हणतो की, तुम्ही आम्ही सर्वच जण ‘इस्लामोफोब’ आहोत. आपण एखादे ‘चुकीचे’ (अर्थात् इस्लामच्या दृष्टीने चुकीचे) नाटक, म्हणजेच व्होल्टायरचे महंमद पैगंबर यांच्या आयुष्यावर बेतलेले ‘महोमत’ नावाचे नाटक बघितले किंवा सलमान रश्दीलिखित ‘द सॅटनिक व्हर्सेस’ सारखे एखादे ‘चुकीचे’ पुस्तक वाचले की, आपण लगेचच ‘इस्लामोफोब’ ठरतो.
२. स्वतःवर ‘इस्लामोफोब’ चा शिक्का न बसण्यासाठी ब्रिटनमध्ये करण्यात येणारी कसरत
‘इस्लामोफोब’ हा शब्द युरोपात (किंबहुना जगभरातच) गेल्या काही दशकांत शिवीसारखा वापरला जायला लागलेला आहे. एखाद्यावर ‘इस्लामोफोब’ असण्याचा आरोप ठेवला गेला की, त्याचे सामाजिक जीवन नकोसे करून ठेवले जाते, त्याला त्याच्या सार्वजनिक जीवनात असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळेच ‘आपल्यावर ‘इस्लामोफोब’ हा शिक्का बसू नये’, यासाठी कुठलाही नागरिक इस्लामविषयी मत व्यक्त करतांना अतिशय काळजीपूर्वक आणि सुरक्षित अशी भूमिका घ्यायला लागतो. इस्लाम, त्यातील कुप्रथा इत्यादींवर टीका न करता ‘ते त्यांच्या धर्माचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे म्हणून सोडून द्यायला लागतो. या सगळ्या गोष्टी ब्रिटनमधील सरकारी अधिवक्ता असोत की न्यायाधीश, कलाकार असोत की पॉपस्टार्स, मंत्री असोत की दस्तुरखुद्द पंतप्रधान, एवढेच कशाला खुद्द ब्रिटीश राजघराणातील प्रिन्सपासून अगदी थेट पोप अशा सगळ्यांकडून अगदी कसोशीने पालन अन् अंगिकारल्या जातात. ‘काहीही झाले, तरी आपल्यावर ‘इस्लामोफोब’ असण्याचा शिक्का बसू नये’, याचा यातील प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न करत असतो. ‘आपली छबी (प्रतिमा) कुठूनही, चुकूनही इस्लामोफोब वाटू नये’, यासाठी ते पराकोटीच्या कसरती करत रहातात !
३. इंग्लंडमधील ‘ग्रुमिंग/रेपिंग गँग्ज’चे कुप्रसिद्ध प्रकरण ‘इस्लामोफोब’चाच दुर्दैवी परिपाक !
इंग्लंडमधील ‘ग्रुमिंग/रेपिंग गँग्ज’चे (बलात्कार करणार्या पाकिस्तानी टोळ्यांचे) कुप्रसिद्ध प्रकरण हा याचाच दुर्दैवी परिपाक आहे. गेल्या २५ हून अधिक वर्षांत इंग्लंडमधील १० ते १५ वर्षे वयोगटातील किमान २० सहस्र ते ५ लाख गौरवर्णीय ब्रिटीश मुलींवर ३० ते ६० वयोगटातील पाकिस्तानी पुरुषांनी अपहरण, डांबून ठेवणे, हत्या, शारीरिक अत्याचार, बलात्कार, सामूहिक बलात्कार अशा प्रकारचे सहस्रो गुन्हे केलेले आहेत.
अ. निष्पाप मुलींना हेरून, त्यांच्याशी ओळख वाढवून, त्यांच्यावर भेटवस्तूंचा वर्षाव करून, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, ही पहिली पायरी.
आ. त्यानंतर त्या मुलींना त्यांच्या ओळखीच्या अन्य मुली, मैत्रिणी, बहिणी इत्यादींना घेऊन येण्यासाठी भाग पाडणे, व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करणे, मादक पदार्थांचा वापर करून त्यांना आपल्या कह्यात घेणे, ही दुसरी पायरी.
इ. पुढे या मुली ओळखीच्या अन्य गटांमध्ये अक्षरशः वाटणे किंवा फिरवणे आणि हे चक्र असंच चालू ठेवणे ही तिसरी पायरी.
(अगदी याच प्रकारे इस्लाममध्ये गुलाम स्त्रियांचा व्यापार होत असे. युद्धात सापडलेल्या कैदी स्त्रियांचे वाटप होत असे. ही पद्धत इस्लामच्या प्रारंभीच्या काळापासून आता थेट अगदी अलीकडे इसिसने यझिदी स्त्रियांना गुलाम बनवण्यापर्यंत वापरण्यात येत होती. लेखिका नादिया मुरादच्या ‘द लास्ट गर्ल’ या सत्यकथेत याचे भयावह उल्लेख आहेत. या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणांवर ब्रिटनमध्ये अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, तसेच अनेक चित्रपट आणि माहितीपट प्रदर्शित करण्यात आले आहेत.)
४. अमेरिकेतील ‘इस्लामोफोबिया’विषयी पुस्तकात करण्यात आलेले भाष्य
त्यानंतर लेखक अमेरिकेतील इस्लामोफोबियाविषयीचे भाष्य करतो. त्यात जॉर्ज बुश यांचयावर चांगलेच कोरडे ओढलेले आहेत. ११ सप्टेंबर २००१ या दिवशीच्या भयंकर आक्रमणानंतर काही दिवसांतच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या बुश यांनी वॉशिंग्टन येथील एका इस्लामी केंद्रात कुराणाचे इंग्रजी भाषांतर हे मूळ अरबी कुराणाशी कसे अप्रामाणिक आहे, या विषयावर भाषण ठोकले होते. त्यानंतर पुस्तकात बराक ओबामा, हिलरी क्लिंटन आणि ‘सीआयए’चे (अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा) संचालक जॉन ब्रेननच्या इस्लाम प्रेमाचे काही प्रसंग नमूद करण्यात आले आहेत. ब्रेनन हा प्रारंभीला अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आतंकवादविरोधी सल्लागार समितीतील एक सामान्य अधिकारी होता, जो काही वर्षांतच ‘सीआयए’च्या संचालक खुर्चीवर जाऊन बसला !
हे लोण हळूहळू अमेरिकन सैन्य दलातही जाऊन पोचल्याचे लेखक नमूद करतो. अफगाणिस्तान युद्धाच्या वेळी कुराणचा अपमान केल्याकारणाने एका ज्येष्ठ सेनाधिकार्यावर कारवाई करण्यात आल्याचे एक उदाहरण वाचून वाचक थक्क होऊन जातो ! वर्ष २००९ मध्ये फोर्ट हूड, टेक्सासमधील सैन्यतळावर असतांना निदाल हसन नावाचा अमेरिकन मेजर आपल्याच सहकार्यांवर बेछूट गोळीबार करून १३ जणांचे जीव घेतो, तर ३२ जणांना जायबंदी करतो; मात्र याला ‘आतंकवादी कृत्य’ न मानता ‘कार्यालयीन हिंसे’चे गोंडस नाव देऊन त्या आतंकवादी मेजरला वाचवले जाते.
५. ‘दावत’ म्हणजे काफिरांना (मुसलमानेतरांना) इस्लाममध्ये येण्यासाठी करण्यात आलेले आवाहन !
‘दावत’ या शब्दाचा अर्थ आपल्याला बॉली‘वूड’वाले सांगतात, तसा ‘मेजवानी’ असा नसून ‘इस्लामच्या भाषेत दावत, म्हणजे धर्मपरिवर्तन, म्हणजेच काफिरांना इस्लाममध्ये येण्यासाठी करण्यात आलेले आवाहन/आमंत्रण’, असे आहे. या दावतचे एक धक्कादायक उदाहरण लेखक आपल्यासमोर उलगडून दाखवतो, तेव्हा आश्चर्याचा दुःखद धक्का बसण्यापलीकडे आपल्या हातात काहीही रहात नाही !
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– हेरंब ओक, न्यूयॉर्क, अमेरिका.