‘देवळात देवतेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेमुळे देवतातत्त्व कसे साकार होते ?’, हे कळण्यासाठी श्री भवानीदेवीच्या मूर्तीस्थापना विधीच्या कालावधीत देवळात ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा केलेला अभ्यास
‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील परिसरात श्री भवानीदेवीसाठी नवीन देऊळ बांधण्यात आले. त्या नूतन देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
आपल्याला ठाऊक आहे की, देवळात एखाद्या देवतेची मूर्ती प्रतिष्ठापित केल्यावर तिच्यामध्ये त्या देवतेचे तत्त्व येते. देवतेचे तत्त्व, म्हणजे त्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने ! देवळाच्या कळसामुळे ब्रह्मांडातील देवतेची सूक्ष्मातीसूक्ष्म (निर्गुण स्तरावरील) स्पंदने आकर्षित होण्यास साहाय्य होते, तसेच देवतेच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारी सगुण स्तरावरील स्पंदनेही कळसाकडून प्रक्षेपित होतात. ही सर्व सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. ती लक्षात येण्यासाठी ‘देवळात देवतेची मूर्ती स्थापित करण्याअगोदर देवळातील स्पंदने कशी असतात ? देवळात देवतेची मूर्ती बसवल्यावर; पण तिच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथे स्पंदने कशी असतात ? मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्या दिवशी देवळात स्पंदने कशी असतात ?’इत्यादींचा अभ्यास देवळातील नाद (कंपने) ध्वनीमुद्रित करून करण्यात आला. हा नाद १. देवळात भूमीलगत, २. भूमीपासून ३० सें.मी. अंतरावर, ३. देवळाचा घुमट (कळसाच्या खालचा अर्धगोलाकार भाग) आरंभ होतो तिथे आणि ४. देवळात घुमटामध्ये सर्वांत वरच्या ठिकाणी (कळसाला आरंभ होतो तिथे), अशा चार स्थानी ध्वनीमुद्रित करण्यात आला. प्रत्येक नाद हा एक ते दीड मिनिटांचा होता. ते सर्व नाद ऐकून मला आलेल्या अनुभूती आणि ‘त्यांवरून देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने देवीचे तत्त्व येण्याची काय प्रक्रिया घडली ?’, याची माहिती येथे दिली आहे. ९.१.२०२५ या दिवशी या लेखाचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील भाग पाहू.
या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871732.html
४ आ : देवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेशी संबंधित विधी झाल्यानंतर ध्वनीमुद्रित केलेले नाद
सारणीत दिलेल्या अनुभूतींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. कळसाचे स्पंदने प्रक्षेपित करण्याचे कार्य आरंभ झाले. कळसातून प्रक्षेपित होणारी स्पंदने देह आणि वातावरण यांची शुद्धी करणारी होती. ती स्पंदने निर्गुण स्तराची असल्याने ‘शांती आणि ध्यान लागणे’, यांची अनुभूती आली. तसेच स्पंदने प्रक्षेपित होत असल्याने ‘मी ब्रह्मांडात भ्रमण करत आहे’, असे मला जाणवले.
२. देवळात घुमटाला आरंभ होतो, तेथील नाद ऐकतांना मला अमरनाथाच्या गुहेचे दर्शन झाले. देवीची मूर्ती स्थापन केलेली असली, तरी तिच्याबरोबर शिवाचीही अनुभूती आली. घुमटाच्या येथे अमरनाथाच्या गुहेचे दर्शन होणे, म्हणजे शिव-पार्वतीचे निर्गुण रूपातील दर्शन होणे. देवतांच्या त्या निर्गुण रूपातील दर्शनामुळे मला थंडावा जाणवला आणि ध्यानही लागले.
३. देवीच्या मूर्तीच्या जवळील नाद ऐकून कैलासावर बसलेल्या शिव-पार्वतीचे दर्शन झाले, म्हणजे त्यांचे सगुण रूपात दर्शन झाले. देवतांच्या त्या सगुण रूपातील दर्शनामुळे मला आनंद जाणवला.
४. देवळातील भूमीलगतचा नाद ऐकून मला देवीच्या प्रत्यक्ष मारक आणि उग्र रूपाची अनुभूती आली; म्हणून मला कालीमाता जाणवली. ती मारक शक्ती असली, तरीही माझे ध्यान लागले.
देवतेच्या तत्त्वाची अनुभूती देणार्या या सर्व नादांमुळे माझ्या सहस्रारावर स्पंदने जाणवून माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
५. श्री भवानीदेवीच्या मूर्तीवर तिचे तत्त्व चढवण्याच्या आणि तिची प्राणप्रतिष्ठा करण्याच्या दिवशी
५ अ. दिवसाच्या आरंभी कोणतेही विधी करण्यापूर्वी ध्वनिमुद्रित केलेले नाद
वरील अनुभूतींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. देवळात घुमटाच्या सर्वांत वरच्या ठिकाणी ब्रह्मांडातील स्पंदने स्थिर झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्या ठिकाणचा नाद ऐकून मला ‘आपण ब्रह्मांडात स्थिर आहोत, तसेच ती स्पंदने पुष्कळ सूक्ष्म आहेत’, असे जाणवले. यावरून देऊळ (देवळात स्पंदने) सूक्ष्मातून पूर्णपणे साकार झाल्याचे जाणवले.
२. देवळात घुमटाला आरंभ होतो, तेथेही ब्रह्मांडातील स्पंदने जाणवली. त्यामुळे पुष्कळ शांत जाणवले. तेव्हाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील स्पंदने मला माझ्या सहस्राराच्या थोडे वर निर्गुण स्वरूपात जाणवली.
३. देवळात भूमीपासून ३० सें.मी. अंतरावर ध्वनीमुद्रित केलेल्या नादाची स्पंदने मला माझ्या सहस्रारावर जाणवली; पण त्या स्पंदनांच्या संदर्भात कोणतीही अनुभूती आली नाही.
४. देवळात भूमीलगत ध्वनीमुद्रित केलेला नाद खोल समुद्रातील असल्याचे जाणवले आणि त्याच्यामुळे गाढ शांतीची अनुभूती आली.
देवळात सर्व ठिकाणी ध्वनीमुद्रित केलेल्या नादांमुळे अव्यक्ताची, म्हणजे निर्गुणाची अनुभूती आली. यावरून आणखी एक लक्षात आले, ‘काल केलेल्या तत्त्वहोमामुळे ग्रहण झालेली देवीची स्पंदने पुष्कळ निर्गुण, म्हणजे उच्च स्तराची आहेत. याचे कारण म्हणजे हे देऊळ सनातन संस्थेच्या आश्रमाच्या सात्त्विक परिसरात बांधले आहे. त्यामुळे तेथील वातावरण पुष्कळ चैतन्यमय आहे. तसेच आश्रमात असलेले संत, आश्रमातील सर्व साधकांचा भाव, आश्रमातील साधक-पुरोहितांनी देवीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केलेले भावपूर्ण आणि शास्त्रोक्त यज्ञ अन् विधी, तसेच त्यांचे शुद्ध मंत्रोच्चार यांमुळे ब्रह्मांडातील देवीची स्पंदने सहजतेने अवतरली. समाजात असे फार अल्प आढळते.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.१०.२०२४) (क्रमश:)
|