दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मुंबईतील ६ महिन्यांचे बाळ ‘एच्.एम्.पी.व्ही.’ग्रस्त; विज्ञापनांमुळे ‘इंडिकेटर’ न दिसल्याने प्रवासी संतप्त !…

मुंबईतील ६ महिन्यांचे बाळ ‘एच्.एम्.पी.व्ही.’ग्रस्त

मुंबई – पवईमध्ये हिरानंदानी  रुग्णालयात ८ जानेवारी या दिवशी ‘ह्युमन मेटाप्युमो’ या विषाणूची ६ महिन्यांच्या बाळाला लागण झाली आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परळ येथील महापालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांना अद्याप असा अहवाल प्राप्त झालेला नाही.


विज्ञापनांमुळे ‘इंडिकेटर’ न दिसल्याने प्रवासी संतप्त !

डोंबिवली – डोंबिवली रेल्वेस्थानकातील ‘स्कायवॉक’वर रेल्वे प्रशासनाच्या अनुमती विज्ञापन आस्थापनांनी विज्ञापनांचे फलक लावले आहेत; मात्र त्यांच्यामुळे लोकलच्या वेळांचे दर्शक (इंडिकेटर) दिसत नसल्याने प्रवासी संतप्त आहेत. प्रवाशांना वाकून किंवा वेगळ्या दिशेला जाऊन ते दर्शक पहावे लागत आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याचा विचार रेल्वेने करावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.


अल्पवयीन मुलीची छेड काढणारा रिक्शावाला अटकेत !

मुंबई – अल्पवयीन मुलीची छेड काढणारा रिक्शावाला राजू वर्मा (वय ३८ वर्षे) याला नागरिकांनी चोप देऊन त्याची धिंड काढली. त्याला अटक करण्यात आली आहे. मीरा रोड येथे ही घटना घडली. १२ वर्षांच्या मुलीला तो त्रास देत होता. त्याने अश्लील पद्धतीने खुणावत तिला सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी खुणावले. मुलीने पळ काढून घरी येऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर नागरिकांनी वरील कृती केली.

संपादकीय भूमिका : अशा वासनांधांना कारागृहात डांबायला हवे !


गांजा तस्कराला पोलीस कोठडी !

नाशिक – गांजाची तस्करी करणार्‍यांचा पाठलाग करून आडगाव पोलिसांनी २८ किलो गांजा जप्त करत एका संशयिताला कह्यात घेतले. संशयितास अटक करून न्यायालयात उपस्थित केले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित चालकाने चारचाकी थेट पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला होता.


महिलांचे लांब केस आवडत नसल्याने तरुणीचे केस कापले !

मुंबई – दादर रेल्वेस्थानकात एका तरुणाने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापले होते. या प्रकरणी चेंबूर येथील दिनेश गायकवाड (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे. त्याला महिलांचे लांब केस आवडत नसल्याने त्याने हा प्रकार केला असल्याचे सांगितले. ऑगस्ट २०२४ मध्येही त्याने ४० वर्षीय महिलेचे केस कापले होते.