खराडी येथील सोसायटीमध्ये दूषित पाणी पुरवणारा टँकर व्यावसायिक कह्यात !
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा पुरवठा केल्याचे उघड !
पुणे – खराडी येथील न्याती ईलसिया सोसायटीमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या टँकर व्यावसायिकाने सोसायटीला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी पुरवले. यामुळे तेथील रहिवाशांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यांचा त्रास झाला. सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर ही गोष्ट उघड झाली. सोसायटीला पाणीपुरवठा करणार्या टँकर व्यावसायिकाला चंदननगर पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
श्रीराम वॉटर सप्लायर्सचे मालक श्रीनिवास दासरी (वय ४० वर्षे) असे टँकर व्यावसायिकाचे नाव आहे. सोसायटीतील रहिवाशांना त्रास चालू झाल्याने त्यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता नंदकुमार जगताप यांच्याकडे तक्रार केली. त्या अन्वये पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांनी सोसायटीला टँकरद्वारे होणार्या पाणीपुरवठ्याचे नमुने पडताळणीसाठी घेतले. पडताळणीअंती या सोसायटीमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरवल्याचे उघड झाले. भारतीय न्यायसंहितेअन्वये नागरिकांच्या आरोग्यास धोका पोचवणे, तसेच फसवणूक करणे यासंदर्भात गुन्हा नोंद केला आहे, असे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकानागरिकांच्या आरोग्याशी आणि जिवाशी खेळणार्या या टँकर व्यावसायिकावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करायला हवा, असे वाटल्यास चूक ते काय ? |