श्री जीवदानीदेवी मंदिर, विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ !
शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’तील निर्णयानुसार कृती !
विरार (जिल्हा पालघर) – मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीसाठी प्रत्येक आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त १ सहस्रांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता. या अनुषंगाने श्री जीवदानीदेवी मंदिर, विरार येथे पालघर जिल्ह्यातील पहिली ‘सामूहिक आरती’ उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवर आणि भाविक यांच्या उपस्थितीत ७ जानेवारीला रात्री करण्यात आली.
१. श्री जीवदानीदेवी संस्थान आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही ‘सामूहिक आरती’ करण्यात आली.
२. या वेळी श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संयोजक श्री. प्रदीप तेंडोलकर, श्री जीवदानी देवी संस्थानचे विश्वस्त श्री. प्रणय नेरूरकर आणि श्री. विजय जोशी, आगाशी, विरार येथील देवस्थान निधी मंडळाचे अध्यक्ष श्री. माधव म्हात्रे आणि विश्वस्त श्री. कमलेश थोपटे, वसई येथील दिवाणेश्वर महादेव मंदिराचे प्रबंधक आचार्य जगदीश शास्त्री, दिवाणमान येथील श्री हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. हेमंत पाटील, हिंदू जनजागृती समितीचे मुंबई आणि पालघर जिल्हा समन्वयक आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे संघटक श्री. बळवंत पाठक यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
३. श्री साई पालखी निवारा, निमगांव, शिर्डी येथे झालेल्या तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त महाराष्ट्रभरातून ८७५ हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते. यात मंदिरे, तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात प्रत्येक आठवड्यातून एकदा ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करणे, काशी आणि मथुरा तीर्थत्रक्षेत्रांचा खटला जदलगती न्यायालयात चालवावा; सरकारने सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत; मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकासकामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी; मंदिर परिसर ‘मद्य-मांस मुक्त’ होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी; मंदिरांच्या पुजार्यांना प्रतिमास मानधन द्यावे आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या मागण्या सरकारने तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी मंदिर महासंघाचे श्री. घनवट यांनी केली आहे.
पुणे येथील श्री कसबा गणपति मंदिरात सामूहिक आरती पार पडली !
पुणे – शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त गावातील मंदिरात सामूहिक आरती करण्याचा निर्धार मंदिर प्रतिनिधींनी केला होता. त्यानुसार ७ जानेवारी या दिवशी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपति मंदिरात सामूहिक आरती झाली. ग्रामदैवत कसबा गणपति मंदिराच्या विश्वस्त श्रीमती संगीताताई ठकार यांनी आरतीचे नियोजन केले होते. या वेळी पुजारी हर्षद ठकार, विश्वस्त ओंकार ठकार, विनायक ठकार आणि माजी उपमहापौर सरस्वती शेडगे, भाजप सरचिटणीस प्रियंका शिंदे आदी मान्यवरांसह भाविक उपस्थित होते. ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे श्री. पराग गोखले, श्री. महेश पाठक आणि श्री. विनीत पाटील उपस्थित होते. श्री. गोखले यांनी आरतीचे महत्त्व आणि मकरसंक्रांतीची माहिती भाविकांना दिली. यामध्ये तरुणांची उपस्थिती होती.
भाविकांनी सामूहिक आरतीचे स्वागत केले आणि ‘हा चांगला उपक्रम चालू केला आहे. तो असाच चालू ठेवूया अन् अधिकाधिक जणांना बोलावू’, असे मत व्यक्त केले.
संपादकीय भूमिका :‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निर्णयानुसार होणारी कृती म्हणजे मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले आश्वासक पाऊल होय ! |