कचरामुक्त पिंपरी-चिंचवडसाठी ८० ठिकाणांवर लक्ष केंद्रित करणार !
महापालिकेचा निर्णय !
पिंपरी (पुणे) – शहरातील कचराकुंड्या हटवल्यानंतर नागरिक मोकळ्या जागेवर कचरा टाकत आहेत. यामुळे आरोग्य विभागाने ८ क्षेत्रीय कार्यालयांतील ८० ठिकाणांची पहाणी करून तेथे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागांतील घंटागाड्यांची वेळ पालटण्यात येणार असून या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्यात आहे, असे साहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.
क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या १० ठिकाणांचे दायित्व १० अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसर स्वच्छ रहाण्यासाठी साहाय्य होईल. त्यानंतरही उघड्यावर कचरा टाकणार्यांवर दंडात्मक कारवाईची चेतावणी आरोग्य विभागाने दिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून देशभर स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रतिवर्षी केंद्राचे पथक फेब्रुवारीमध्ये येते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने स्वच्छतेसाठी आतापासून पुढाकार घेण्यास प्रारंभ केला आहे.
शहरातील विविध मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या कमी आहे. कामानिमित्त घराबाहेर पडणार्या नागरिक आणि महिलांची स्वच्छतागृहांअभावी मोठी अडचण होते. शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर नागरिकांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाते; मात्र अनेक पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे बंद अथवा नादुरुस्त असतात. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व पेट्रोप पंपचालकांना नागरिकांसाठी स्वच्छतागृहे सुरू ठेवण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी पंपचालकांना पत्रही देण्यात येणार आहे. एक महिन्यानंतर सर्व पेट्रोप पंपांवरील स्वच्छतागृहे स्वच्छ आणि वापरण्यायोग्य आहेत का, याची पाहणी केली जाणार आहे. स्वच्छतागृहे सुरू न ठेवणार्या पंपचालकांना नोटीस बजावण्यात येणार आहेत.