विवाहानंतरही माहेरचे आडनाव लावून हिंदु संस्कृतीतील दुसर्याशी एकरूप होण्याचे तत्त्व नाकारणारी स्त्रीमुक्ती नको !
विवाहानंतर स्त्रीने स्वत:च्या नावासोबत सासरचे आडनाव लावण्याची हिंदु संस्कृतीतील प्राचीन परंपरा आहे. हल्ली पुरोगामीत्वाचा पगडा असलेल्या काही महिला स्त्रीमुक्तीच्या नावाखाली माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही आडनावे लावतात.
‘स्वला त्यागून दुसर्यात विलीन होणे’, हा हिंदु धर्मातील मूलभूत सिद्धांत आहे. प्राचीन परंपरेनुसार विवाहानंतर मुलीने सासरचे आडनाव लावण्यामागे ‘तिने सासरच्या कुटुंबामध्ये विलीन व्हावे’, असा उद्देश होता.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले
अध्यात्मशास्त्रानुसार पुण्यवान पुरुषाची पुण्यकर्मे आणि साधना करणार्या पुरुषाची साधना यांचे अर्धे फळ त्याच्या पत्नीला मिळते. या फलप्राप्तीमुळे तिच्या जीवनाचे कल्याण होते; मात्र त्यासाठी तिने तिच्या पतीशी अधिकाधिक एकरूप होणे आवश्यक आहे. त्याकरता तिने स्वतःचे नाव, तसेच माहेरचे आडनाव यांचा त्याग करणे, पतीच्या कुटुंबियांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे, इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
त्या साध्य झाल्यास स्त्रीचा अहंभाव न्यून होऊन तिला विवाहाचे आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण फळ प्राप्त होऊ शकते. यावरून आपल्या हेही लक्षात येते की, पुरुषाने पत्नीच्या कुटुंबियांशी एकरूप होणे, हे त्याला मानसिक स्तरावर सुख देणारे आहे, तर स्त्रीने पतीशी आणि त्याच्या कुटुंबियांशी एकरूप होणे, हे तिला आध्यात्मिक स्तरावर लाभ देणारे आहे.
– सुश्री सुप्रिया नवरंगे (११.३.२०२४)
अनेक संतांनीही स्वत:च्या शिष्यांची नावे पालटल्याची अनेक उदाहरणे आहेत. शिष्यांची नावे पालटण्यामागे ‘नावासोबत आलेले सर्व संस्कार आणि अहंभाव त्यागून गुरूंशी एकरूप व्हावे’, ही संकल्पना असते.
हीच प्रक्रिया स्त्रीने विवाहानंतर माहेरचे नाव त्यागून सासरचे नाव अंगीकारण्यामागे होती.
तात्पर्य विवाहानंतर स्त्रीचे आडनाव पालटण्यामागे तिला जोखडात ठेवण्याचा नव्हे, तर तिला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे विवाहित स्त्रीने माहेरचे आडनाव लावणे, म्हणजे इतरांमध्ये विलीन होण्याची आध्यात्मिक संधी नाकारणे होय.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले