‘आत्मिक आनंद’ मिळवा !
सामाजिक माध्यमांमध्ये एक ‘व्हिडिओ’ नुकताच प्रसारित झाला. यात व्यक्ती तिचा आनंद बाह्य गोष्टींमध्ये शोधत असते. सावळा किंवा काळा रंग असलेल्या व्यक्तींना गोरे व्हायचे असते, कुरळे केस असलेल्या व्यक्तींना सरळ केस हवे असतात आणि सरळ केस असणार्या व्यक्तींना कुरळे केस हवे असतात. एखादी वस्तू आपल्याकडे नाही; पण तीच दुसर्याकडे असल्यास आपल्याला हवी असते. स्वत:चे उत्पादन विकण्यासाठी ग्राहकाकडे जे नाही, याचे विज्ञापन केले जाते. यातून व्यक्तीला दु:ख होते. या ‘व्हिडिओ’तून ‘आपल्याकडे जे आहे, त्याविषयी अखंड कृतज्ञ असावे,’ असा उत्तम संदेश देण्यात आला आहे.
आज निरोगी आरोग्य, प्रेमळ नातेवाइक, जवळचे मित्रमैत्रिणी; देवाच्या कृपेने झालेली अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय हे जीवन जगण्यासाठी आवश्यक अन् पुरेसे आहे. अनेकांकडे तर हेही नसते; मग आपल्याकडे ते आहे, तर आपण याविषयी कृतज्ञच असायला हवे. जे नाही, त्यासाठी रडत बसण्यापेक्षा जे आहे, त्यात समाधान मानून वर्तमान क्षण आनंदात घालवणे महत्त्वाचे आहे.
वैज्ञानिक प्रगतीमुळे आज अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. ५० ते ६० वर्षांपूर्वी यातील काहीच नव्हते; मात्र तेव्हाही लोक आनंदाने किंवा सुखासमाधानाने जगत होतेच ! कष्ट तर आतापेक्षा अधिक होते; पण त्या कष्टांमुळे आरोग्य आणि निसर्ग दोन्हीही उत्तम होते. या ठिकाणी कोणतीही परिस्थिती किंवा व्यक्ती यांच्याशी तुलना करण्याचा हेतू नाही, तर ‘आपल्याकडे जे नाही, ते मिळवणे, म्हणजे आनंद’, हे चुकीचे समीकरण आहे, इतकेच मांडायचे आहे.
स्पर्धेच्या युगात पैसा, प्रसिद्धी यांची इतरांसमवेत स्पर्धा किंवा तुलना करण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धा करायला हवी. आयुष्यातील घटनांकडे पहाण्याचा दृष्टीकोन, प्रतिसाद देण्याची, तसेच परिस्थिती हाताळण्याची पद्धत, समजून घेण्याची वारंवारता, मनाची स्थिरता यांच्यात ‘कालच्या पेक्षा आज प्रगती आहे का ?’, अशा विचारांची स्पर्धा करायला हवी. आपण या स्पर्धेत उतरलो, तरच नेहमी आनंदी राहू शकतो. हा आनंद आपल्या आतच असतो. त्यामुळे तो बाहेर शोधण्याची आवश्यकता नाही !
‘सोशल मिडिया’मुळे आपल्यामध्ये सुखाच्या हव्यासाच्या संदर्भात विविध इच्छा निर्माण होतात, जे खरेतर क्षणिक सुख असते; पण ते वेळीच लक्षात न आल्याने आपण त्यामागे धावत असतो. यामुळे आपली वैयक्तिक जडणघडण होण्याची दिशाच पालटते. आपण भरकटतो. परिणामी आनंद मिळत नाहीच; पण शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता खर्च होते. हे सर्व पहाता भगवंताच्या कृपेने जे मिळाले आहे, त्याविषयीची कृतज्ञताच आपल्याला ‘आत्मिक आनंद’ मिळवून देऊ शकते. तो मिळवण्याचाच सर्वांनी प्रयत्न करायला हवा !
– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी