सभागृह समिती म्हादईचे पाणी वळवलेल्या ठिकाणची पहाणी करणार !
म्हादईसंबंधी सभागृह समितीचा बैठकीत निर्णय
पणजी, ८ जानेवारी (वार्ता.) – म्हादई जलवाटप तंट्यासंबंधी सरकारने नियुक्त केलेल्या सभागृह समितीने कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी काम चालू केलेल्या कळसा, भंडुरा, हलतरा आदी ठिकाणांची पहाणी करण्याचे ठरवले आहे. गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यीय सभागृह समितीची ८ जानेवारी या दिवशी पर्वरी येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सभागृह समितीमध्ये भाजप, काँग्रेस, मगोप, गोवा फॉरवर्ड, आप, आर्.जी. या पक्षांचे आणि अपक्ष आमदार यांचा समावेश आहे. ही समिती जानेवारी २०२३ मध्ये स्थापन झाली होती आणि ८ जानेवारी २०२५ मध्ये समितीची दुसरी बैठक पार पडली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘गोव्याच्या जलस्रोत खात्याच्या पथकाने केलेल्या पहाणीत कर्नाटकाने अलीकडच्या काळात म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी कोणतेही काम केले नसल्याचे आढळले नाही’’.
पहाणीसाठी अनुमती मिळवण्यासाठी सभापती कर्नाटकाच्या सभापतींना पत्र लिहिणार
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘गोवा विधानसभेचे सभापती कर्नाटक विधानसभेच्या सभापतींना म्हादईच्या पहाणीसाठी अनुमती मागण्यासंबंधी पत्र लिहिणार आहेत. कर्नाटकने अनुमती दिल्यास ‘कर्नाटकने काही चुकीचे केले नाही’, याची खात्री होईल. कर्नाटक वर्ष २०१० पासून काही प्रमाणात म्हादईचे पाणी वळवण्याचे काम करत आहे; मात्र गोवा सरकार म्हादई नदीच्या संवर्धनासाठी ‘म्हादई प्रवाह प्राधीकरणा’ची स्थापना करून, तसेच राजकीय स्तरावर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून लढा देत आहे.’’
म्हादई प्रश्न २० जानेवारी या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येण्याची शक्यता
जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘म्हादईचे पाणी कर्नाटकाने वळवल्यासंबंधी गोवा सरकारने प्रविष्ट (दाखल) केलेल्या खटल्यावर सर्वोच्च न्यायालयात २० जानेवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गोव्याच्या बाजूने १० हून अधिक अधिवक्ता, महाधिवक्ता आणि २ ज्येष्ठ अधिवक्ता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.
कर्नाटक म्हादईचे पाणी वळवण्याच्या सिद्धतेत; मात्र गोवा सरकारचे प्रयत्न अपुरे !
पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांचा आरोप
पणजी गोवा राज्य सरकारने म्हादईच्या प्रकरणी गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कर्नाटक म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कळसा प्रकल्पाचे काम जोमाने करत आहे, तर नर्से येथे म्हादईच्या भंडुरा या उपनाल्यातून कर्नाटकमधील मलप्रभा नदीत पाणी वळवण्यासाठी कर्नाटक सिद्ध आहे. गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याच्या अभियंत्याने हल्लीच नर्सेे (कर्नाटक) येथे भेट देऊन कर्नाटकचे पाणी वळवण्यासाठी पूर्ण जोमाने काम चालू असल्याच्या वृत्ताची निश्चिती केली आहे. गोवा सरकारला हे काम बंद करण्यास अपयश आले आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या वारंवार पंतप्रधान आणि अन्य नेते यांची भेट घेऊन केंद्रावर याविषयी दबाव आणत आहे; मात्र गोवा सरकारकडून अजूनही याविषयाकडे गंभीरतेने पाहिले जात नाही, अशी खंत गोव्यातील प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने म्हादईसंबंधी स्थापन केलेल्या सभागृह समितीच्या ८ जानेवारी या दिवशी होणार्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी हा आरोप केला आहे.
पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर पुढे म्हणाले,‘‘म्हादईसंबंधीच्या सभागृह समितीचे अध्यक्ष तथा जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर आणि इतर सदस्य यांनी प्रत्यक्ष कणकुंबी आदी ठिकाणी भेट देऊन घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत.’’