आपल्या ‘डिजिटल’ व्यवहारांचे (इंटरनेटच्या माध्यमातून होणारे व्यवहार) संरक्षण करा !

जसे डिजिटल व्यवहार आपल्या दैनंदिन जीवनात वाढत आहेत, तसेच सायबर सुरक्षेच्या मजबूत उपाययोजनांची आवश्यकताही वाढत आहे. ‘कॅशलेस पेमेंट्स’ (रोख रक्कम न वापरता व्यवहार करणे), ‘ऑनलाईन बँकिंग’ आणि ‘इ-कॉमर्स’ यांच्या वाढीमुळे प्रत्येक व्यक्ती एका विस्तृत डिजिटल अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. या पालटांमुळे अनेक संधी उपलब्ध होतात; परंतु यामुळे वापरकर्त्यांना जटील सायबर धोक्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

या विकसित होत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वातावरणात मार्गक्रमण करण्यासाठी आपल्याला डिजिटल सुरक्षा पद्धतींचे ज्ञान आणि त्यांची कार्यवाही सतत अद्ययावत् करणे अत्यंत आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह सायबर गुन्हेगारांनी (‘सायबर गुन्हा’ म्हणजे संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करून केला जाणारा गुन्हा) वापरलेल्या तंत्रांमध्येही सुधारणा होत आहे. त्यामुळे नवीन संभाव्य धोके आणि सक्रीय सुरक्षा उपाय यांविषयी माहिती ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबर सुरक्षेविषयी शिक्षण आणि जागरूकता याला प्राधान्य देऊन आपण डिजिटल व्यवहारांच्या भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिक सक्षम होऊ शकतो. यामुळे आपल्या आर्थिक संपत्तीचे आणि वैयक्तिक माहितीचे प्रभावीपणे संरक्षण करता येईल.

१. डिजिटल व्यवहारांमध्ये सायबर सुरक्षेचे महत्त्व

अ. फसवणुकीपासून संरक्षण : सायबर गुन्हेगार डिजिटल पद्धतीतील त्रुटींचा लाभ घेतात आणि त्यामुळे आपली आर्थिकदृष्टीने हानी होते. सायबर सुरक्षा उपायांविषयी ज्ञान असल्यावर वापरकर्त्यांना त्यांचे मेहनतीने कमावलेले पैसे संरक्षित करण्यास साहाय्य होते.

आ. वैयक्तिक माहितीचे संरक्षण : ऑनलाईन व्यवहारांच्या वाढीसह वैयक्तिक माहितीही आता धोक्यात आली आहे. सायबर सुरक्षा पद्धतींचा अभ्यास केल्याने माहितीचे उल्लंघन आणि ओळखीविषयीची होणारी चोरी टाळता येते.

इ. व्यवहारांची अखंडता : सुरक्षित डिजिटल व्यवहार सुनिश्चित करणे, हे वित्तीय प्रणालींवर विश्वास ठेवण्यास साहाय्यभूत ठरते. सुरक्षा नियमांची माहिती असल्यास व्यवहारांची अखंडता वाढते.

ई. सुशिक्षित वापरकर्ते एक अधिक सुरक्षित ऑनलाईन वातावरण सिद्ध करण्यात योगदान देऊ शकतात. यामुळे सर्वांना लाभ होतो.

उ. सायबर धोके सतत विकसित होत आहेत. नवीन फसवणुकींविषयी आणि सुरक्षा उपायांविषयी माहिती ठेवणे, हे सायबर चोरीपासून प्रभावी संरक्षण करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

२. काही महत्त्वपूर्ण सूचना

श्री. नारायण नाडकर्णी

येथे देत असलेल्या सूचीचा अवलंब करणे थोडे कठीण वाटू शकते; परंतु या उपाययोजनांचे पालन करणे आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.

अ. आपल्या उपकरणांचे संरक्षण करा, सर्व उपकरणे अद्ययावत् ठेवा आणि ती  ‘अँटीव्हायरस’ प्रणालीने संरक्षित ठेवा.

आ. सुरक्षित आणि चांगला संकेतांक वापरा आणि शक्य असल्यास दुहेरी प्रमाणीकरण (2FA) सक्षम करा.

इ. नवीन अशा फसवणुकीच्या तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत् राहा.

इ. प्रामाणिकतेची पडताळणी करून सतर्क रहा. वैयक्तिक किंवा आर्थिक माहितीच्या कोणत्याही मागण्याची प्रामाणिकता पडताळा.

उ. आपल्या खात्यावर नियमित लक्ष ठेवा आणि कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची त्वरित नोंद घेऊन बँकेला कळवा.

३. निष्कर्ष

भारत डिजिटल अर्थव्यवस्थेकडे जात असतांना प्रत्येक व्यक्ती सक्रीय उपाययोजना करून आणि सायबर धोक्यांविषयी शिक्षित राहून सुरक्षिततेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या शिफारसींचा अवलंब करून आणि सतर्क राहून आपण केवळ स्वतःचेच संरक्षण करत नाही, तर भारताच्या जलद विकसित होत असलेल्या डिजिटल वातावरणासाठी एक अधिक सुरक्षित डिजिटल वातावरण सिद्ध करण्यात योगदान देतो. सायबर सुरक्षा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. माहिती अद्ययावत् ठेवणे आणि सावध राहिल्यास डिजिटल व्यवहारांशी संबंधित धोके न्यून करता येतील. यामुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी सर्वांसाठी सुरक्षित आर्थिक भविष्य सुनिश्चित होईल. या पद्धतींचा अवलंब करून व्यक्ती डिजिटल वित्तीय जटील व्यवहारामध्ये आत्मविश्वासाने मार्गक्रमण करू शकतो. यामुळे सायबर धोके प्रभावीपणे रोखले जाऊ शकतील; कारण सायबर सुरक्षेविषयी प्रतिबंध नेहमीच उपचारापेक्षा चांगला असतो.

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.


‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडून सायबर सुरक्षेविषयी करण्यात आलेल्या महत्त्वाच्या शिफारसी


डिजिटल पद्धतीने वित्तीय व्यवहार सुरक्षितपणे करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्त्वाच्या ४० सायबर सुरक्षा सूचना दिल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :

१. आपला ‘पिन’ (PIN – संकेतांक), ‘ओटीपी’ (व्यवहाराच्या वेळी बँकेकडून येणारा एक प्रकारचा संकेतांक) किंवा ‘ए.टी.एम्. कार्ड’वरील ‘सीव्ही कोड’ कुणालाही सांगू नका. अगदी बँक अधिकार्‍यांनी विचारल्यावरही सांगू नका.

२. आपल्या सर्व आर्थिक खात्यांवर २ वेळा येणारी सुरक्षेविषयीचे दुहेरी प्रमाणीकरण (2FA) सक्षम करा.

३. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी सुरक्षित आणि अद्वितीय ‘पासवर्ड’ (संकेतांक) वापरा.

४. स्वतःचा भ्रमणभाष आणि संगणक यांच्या ‘ऑपरेटिंग सिस्टम’ (कार्यप्रणाली) अन् त्यातील सूचना नियमितपणे अद्ययावत् करा.

५. सार्वजनिक इंटरनेटवर (‘वाय फाय नेटवर्क’वर) आर्थिक व्यवहार टाळा.

६. आपल्या सर्व उपकरणांवर मानांकित ‘अँटीव्हायरस सॉफ्टवेअर’ (संगणकीय विषाणू रोखण्यासाठीची प्रणाली) स्थापित करा आणि ती नियमितपणे अद्ययावत् करा.

७. वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती मागणार्‍या ‘फिशिंग इ-मेल्स’विषयी (फसवणारी संगणकीय पत्रे) सावध रहा.

८. कोणत्याही वैयक्तिक माहितीच्या मागणीच्या स्रोतांची पडताळणी करा.

९. अनधिकृत क्रियांसाठी आपली ‘बँक स्टेटमेंट्स’ (खाते उतारा) आणि ‘क्रेडिट रिपोर्ट’ (ए.टी.एम्.च्या व्यवहाराचा उतारा) नियमितपणे पडताळा.

१०. आर्थिक व्यवहारांसाठी फक्त अधिकृत ‘बँकिंग ॲप्स’ आणि संकेतस्थळ वापरा.

११. विशेषतः तातडी निर्माण करणार्‍या अनपेक्षित प्रलोभनांपासून सावध रहा.

१२. अनामिक स्रोतांकडून ‘लिंक’वर ‘क्लिक’ करू नका किंवा ‘अटॅचमेंट डाऊनलोड’ करू नका. (धारिका किंवा एखादी प्रणाली संगणकामध्ये न घेणे.)

१३. संवेदनशील माहिती ऑनलाईन प्रविष्ट करतांना ‘व्हर्चुअल (आभासी) की बोर्ड’चा वापर करा.

१४. आपल्या सर्व बँक खात्यांसाठी आणि ‘क्रेडिट कार्डां’साठी व्यवहार ‘अलर्ट सेट’ (सतर्कता संदेश) करा.

१५. आपल्या भ्रमणभाष उपकरणांवर आर्थिक माहिती संग्रहित करण्यापासून टाळा.

१६. असुरक्षित नेटवर्कवर वित्तीय खात्यांमध्ये प्रवेश करतांना ‘व्ही.पी.एन्.’ (खासगी  म्हणजेच स्वतःचे इंटरनेट नेटवर्क) वापरा.

१७. आपल्याला माहिती मागणारे लघुसंदेश किंवा संपर्कांविषयी सावध रहा.

१८. आर्थिक व्यवहारांनंतर आपल्या ब्राऊझरमधून येणार्‍या ‘कुकीज’ नियमितपणे साफ करा.

१९. संवेदनशील माहिती सामायिक करतांना ‘एन्क्रिप्टेड’ संवाद पद्धतीचा वापर करा.

२०. पुष्कळ चांगल्या वाटणार्‍या व्यवहारांविषयी नेहमी संशयास्पद रहा. ते व्यवहार सहसा खोटे असतात.

२१. सामान्य फसवणूक तंत्रांविषयी स्वतःला शिक्षित करा आणि नवीन फसवणुकींविषयी अद्ययावत् रहा.

२२. ऑनलाईन खरेदीसाठी सुरक्षित, प्रतिष्ठित ‘पेमेंट गेटवे’चा (संगणकीय वा भ्रमणभाष प्रणालीचा) वापर करा.

२३. ऑनलाईन दान देण्यापूर्वी धर्मादाय संस्थांची प्रामाणिकता पडताळा.

२४. अधिक परताव्याचे वचन देणार्‍या गुंतवणूक योजनांपासून सावध रहा.

२५. आपली खाते माहिती कळवण्याविषयी सांगणारे इ-मेल किंवा संदेश यांना प्रतिसाद देऊ नका.

२६. सामाजिक माध्यमांवर आपल्या वैयक्तिक माहितीस मर्यादा घालण्यासाठी गोपनीयता ‘सेटिंग्ज’चा वापर करा.

२७. ऑनलाईन शोधातून मिळालेल्या खोट्या ग्राहक सेवा क्रमांकांपासून सावध रहा.

२८. आपल्या संकेतांकामध्ये सहज अंदाज लावता येईल, अशी माहिती (जसे जन्मदिनांक) वापरण्यास टाळा.

२९. आपल्या उपकरणांवरील प्रणालींच्या परवानगींचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि योग्य त्या सूचना रहित करा.

३०. उपलब्ध असल्यास ‘बायोमेट्रिक’ प्रमाणीकरण (फिंगरप्रिंट (बोटाचे ठसे), फेस आयडी (चेहर्‍याची ओळख) वापरा.

३१. ‘क्यू.आर्. कोड’ फसवणुकीपासून सावध रहा. स्कॅन करण्यापूर्वी प्राप्तकर्ता पडताळा.

३२. आपला ‘यू.पी.आय. पिन’ (पैसे हस्तांतरणाच्या प्रणालीचा संकेतांक) सामायिक करू नका किंवा अनभिज्ञ विनंत्या मान्य करू नका.

३३. आपल्याला बँक किंवा वित्तीय संस्था यांतून संपर्क करणार्‍याची ओळख पडताळा.

३४. विशेषतः आगाऊ शुल्क मागणार्‍या अनपेक्षित ‘क्रेडिट’ किंवा कर्ज यांच्या योजनांपासून सावध रहा.

३५. बँका आणि कंपन्या यांसाठी ग्राहक सेवा क्रमांक शोधण्यासाठी अधिकृत स्रोतांचा वापर करा.

३६. प्रशिक्षण किंवा पार्श्वभूमी पडताळणीसाठी पैसे मागणार्‍या खोट्या नोकरीच्या आमिषांपासून सावध रहा.

३७. पुरस्कार जिंकण्यासाठीचे शुल्क भरण्यासाठी आवश्यक असलेल्या लॉटरी किंवा पुरस्कार फसवणुकीपासून सावध रहा.

३८. ‘डेटिंग साईट्स’ किंवा सामाजिक माध्यमांवर प्रेम प्रकरणांच्या फसवणुकांपासून सावध रहा.

३९. कोणत्याही संशयास्पद क्रिया किंवा व्यवहारांची आपल्या बँकेत त्वरित तक्रार करा.

४०. बँक किंवा रिझर्व्ह बँक यांद्वारे दिलेल्या सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रमात सहभागी व्हा.

या महत्त्वाच्या सूचनांची कार्यवाही करणे महत्त्वाचे आहे.