गुरूंप्रती श्रद्धा असणार्‍या पाचल, राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथील कै. (श्रीमती) ज्योती प्रकाश चिंचळकर !

‘२०.१.२०२४ या दिवशी श्रीमती ज्योती प्रकाश चिंचळकर यांचे निधन झाले. ९.१.२०२५ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. (श्रीमती) ज्योती चिंचळकर !

१. कौटुंबिक दायित्व निभावणे

‘आईने माझ्या वडिलांच्या अपघाती निधनानंतर २४ वर्षे आम्हा दोन्ही बहिणींचे व्यवस्थित पालनपोषण केले. तिने आमचे शिक्षण पूर्ण केले. तिने माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न केले.

कु. दीप्ती प्रकाश चिंचळकर

२. देवाने साधिकेचे आणि तिच्या आईचे प्रारब्ध सुसह्य करणे अन् साधिकेला दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचा उपयोग होणे

मे २०२० मध्ये माझ्या आईचे आजारपण चालू झाले. तेव्हा तिला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. तेव्हा मला प्रथमोपचार प्रशिक्षणवर्गात शिकवलेल्या गोष्टींचा पुष्कळ लाभ झाला. त्याच कालावधीत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये एका साधिकेच्या आजारपणाच्या संदर्भातील लेख प्रकाशित होत होते. त्याचा मला लाभ झाला. देवाने आम्हा दोघींचे प्रारब्ध सुसह्य केले.

३. आईची मानस दृष्ट काढल्यावर तिच्या आईचा त्रास न्यून होणे

आईला पहिल्यांदा अतीदक्षता विभागात भरती केले असतांना तिची मानस दृष्ट काढली. त्या वेळी ‘आईला त्रास देणारी अनिष्ट शक्ती निघून गेली’, असे तिला स्पष्टपणे जाणवले होते. त्यानंतर आईचा त्रास वाढल्यामुळे तिला रात्रभर झोप लागत नसे. तेव्हा माझ्या मोठ्या बहिणीने (सौ. अनन्या सरदेसाई हिने) आईची दिवसातून ३ वेळा मानस दृष्ट काढली. तेव्हा आईचा त्रास न्यून होऊन तिला झोप लागत असे.

४. कर्करोगाचे  निदान  लवकर झाल्यामुळे उपचार करता येणे

‘आईला पहिल्या टप्प्याचा गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे’, असे निदान झाले. सहसा एवढ्या लवकर कर्करोगाचे निदान होत नाही. आईला झालेल्या कर्करोगाचे निदान लवकर झाल्यामुळे आईवर वेळेवर उपचार करता आले.

५. अहं अल्प असणे

आई रुग्णाईत असतांना मी काही वेळा तिच्यावर रागवत असे. तेव्हा ती मला सांगायची, ‘‘आपण सनातनमध्ये आहोत. आपण असे वागायचे नाही. तू चुकत आहेस.’’ आई रुग्णाईत असतांना ती मला एखादा अयोग्य शब्द बोलल्यास ती त्या अवस्थेतही माझी हात जोडून क्षमा मागत असे. तिचा अहं अल्प होता.

६. आईने नामजपादी उपाय केल्यावर तिचा त्रास न्यून होणे

सद्गुरु सत्यवान कदम यांनी आईला नामजपादी उपाय सांगितले होते. आईने नामजपादी उपाय श्रद्धेने पूर्ण केले. तिने नामजपादी उपाय केल्यावर तिला वेदना सुसह्य झाल्या. शेवटच्या काळात आईला असह्य वेदना होत असत. तेव्हा आई ‘गुरुदेव, गुरुदेव’ असे आळवायची. तिला शेवटी रुग्णालयात भरती केले होते. तिथे आधुनिक वैद्य येण्यापूर्वीच आईसाठी नामजपादी उपाय मिळाले. आईला लागलेला दम ते नामजपादी उपाय केल्यावर न्यून झाला. आईला अशा अनुभूती या आजारपणातच नव्हे, तर प्रत्येक अडचणीच्या वेळीही आल्या.

७. गुरूंप्रती श्रद्धा

‘आईने शेवटचा श्वास घेतांना देवाचे नाव घ्यावे’, असे मला वाटत होते. मी तिच्याशी ‘गुरुस्मरण आणि नामजप’ यांविषयी बोलत होते. शेवटी आईने डोळे फिरवले आणि तिचा श्वास मंदावत चालला होता. ती कोणत्याच गोष्टीला प्रतिसाद देत नव्हती. त्या वेळी रुग्णालयात साधक श्री. गजानन मुंज आले होते. ते आईला म्हणाले, ‘‘भोग हे देहाचे असतात. आपण तर आत्मा आहोत. आत्मा कसा असतो ? आत्मा सच्चिदानंद असतो

ना !’’ तेव्हा आईने डोळे हलवले. त्यानंतर मी म्हटले, ‘‘सच्चिदानंद कोण आहेत ? परम पूज्य आहेत ना !’’ मी आईला गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवानिमित्त मिळालेले स्मृतीचिन्ह (बॅच) दाखवले. त्या वेळी एकदा तिने डोळे हलवले आणि त्याकडे बघितले अन् लगेच डोळे फिरवले. ‘शेवटच्या क्षणी तिने गुरुदेवांच्या संदर्भातील बोलण्याला प्रतिसाद दिला’, हे पाहून मला बरे वाटले. ‘ती मायेतून मुक्त होत आहे’, असे मला जाणवले.

८. आईच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. आईचे निधन झाल्यावर तिचा चेहरा गोरा झाला होता.

आ. ‘तिचा श्वास चालू आहे’, असे मला वाटत होते.’

– कु. दिप्ती प्रकाश चिंचळकर (कै. (श्रीमती) चिंचळकर यांची धाकटी मुलगी), पाचल, राजापूर, जि. रत्नागिरी. (२७.११.२०२४)