वैद्यकीय व्यवसाय नीतीने करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे लासलगाव (जिल्हा नाशिक) येथील कै. आधुनिक वैद्य सुशील मनोहर कुलकर्णी (वय ६४ वर्षे)!
‘२६.१२.२०२४ या दिवशी लासलगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील आधुनिक वैद्य सुशील मनोहर कुलकर्णी (वय ६४ वर्षे) यांचे निधन झाले. ९.१.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १४ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुली आणि साधक यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. श्रद्धा सुमित जोशी (मोठी मुलगी), नाशिक आणि सौ. स्नेहा केंगे (धाकटी मुलगी), अहिल्यानगर
१ अ. नम्र : ‘आमचे बाबा आधुनिक वैद्य असूनही नेहमी लहान-मोठ्यांशी नम्रतेने वागत होते.
१ आ. उत्साही आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य : बाबा कधीही कारणाविना घरी रहात नसत. त्यांना रात्री झोपायला कितीही उशीर झाला, तरीही ते सकाळी ५ वाजता उठून नामजप पूर्ण करूनच चिकित्सालयात जात असत. ते दिवसभर पुष्कळ व्यस्त असायचे, तरीही ते व्यष्टी साधना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. ‘दिसेल ते कर्तव्य’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या (बाबांच्या) सुवचनाप्रमाणे बाबा वागत असत.
१ इ. काटकसरी : बाबांचा ‘प्रत्येक मासाला मिळणारी मिळकत हे गुरुधन आहे’, असा भाव होता. ते अत्यंत काटकसरी होते.
१ ई. गरजू रुग्णांना साहाय्य करणे : एखाद्या रुग्णाकडे पैसे नसल्यास बाबा त्याच्याकडून पैसे घेत नसत. बाबाच त्यांना गोळ्या आणि औषध विकत घेण्यासाठी पैसे देत असत.
१ उ. व्यवसाय नीतीने करणे : बाबांनी वैद्यकीय व्यवसाय करतांना कधीही अयोग्य कृती केली नाही. एखादा रुग्ण केवळ औषधोपचाराने बरा होणार असल्यास बाबांनी कधीही त्याला अनावश्यक ‘इंजेक्शन’ दिले नाही किंवा ‘सलाईन’ लावले नाही. बाबांनी ‘वैद्यकीय व्यवसायात पैसे मिळावे’, अशी कधीही अपेक्षा केली नाही
१ ऊ. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे : ते आयुष्यात आलेली अनेक संकटे आणि अडचणी यांना धिराने सामोरे गेले. त्यांनी कधीही व्यक्ती किंवा परिस्थिती यांविषयी गार्हाणे केले नाही. ‘प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारण्यातच आपली साधना होते’, असे त्यांनी आम्हाला शिकवले. ‘‘समोरची व्यक्ती कशीही वागली, तरीही आपण समोरच्या व्यक्तीशी चांगलेच वागायचे’’, असे ते नेहमी सांगत.
१ ए. चुकांविषयी संवेदनशील : बाबांनी आम्हाला आमच्या चुकांची प्रेमाने जाणीव करून दिली. त्यांच्याकडून आमच्या संदर्भात एखादी चूक झाली, तर ते आमचे वडील असूनही आमची क्षमा मागत असत.
१ ऐ. सेवेची तळमळ : बाबा नातेवाईक आणि त्यांचे रुग्ण यांना साधना आणि धर्म यांविषयी सांगत असत. ते आधुनिक वैद्य असूनही ग्रंथप्रदर्शनावर सेवा करत असत. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत असत. त्यांच्या या कृतींमुळे गावातील लोक आणि नातेवाईक त्यांना अनेक प्रश्न विचारत असत; पण बाबांनी कधीही या सेवा करणे सोडले नाही.
१ ओ. त्यांची प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा होती. ते म्हणत, ‘‘प.पू. गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आपण करायलाच हवे.’’
१ औ. भगवंताच्या अनुसंधानात रहाणे : बाबांना रुग्णालयात भरती करण्याच्या एक दिवस आधी ते मला म्हणाले, ‘‘प्रत्येक वेळी आपल्याला सेवा करायला जमेलच असे नाही; पण आपण सतत नामजप करायचा आणि भगवंताच्या अनुसंधानात रहायचे.’
२ सौ. श्रद्धा सुमित जोशी (मोठी मुलगी), नाशिक
२ अ. बाबांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. ‘बाबांना घरी आणल्यानंतर त्यांचा चेहरा पुष्कळ हसरा दिसत होता.
२. बाबांचे पार्थिव ८ – ९ घंटे उलटून गेले, तरीही उबदार लागत होते.
३. बाबांचे पाय अतिशय पिवळ्या रंगाचे दिसत होते. असे समाजातील अन्य लोकांनाही जाणवले. बाबांचे पाय अतिशय मऊ लागत होते.
४. बाबांचे पार्थिव घरून नेल्यानंतर जी समई लावली होती, ती समई सगळीकडून हवा असूनही ४ दिवस तेवत होती आणि त्यातील ज्योत स्थिर होती.’
३. सौ. स्नेहा केंगे (धाकटी मुलगी), अहिल्यानगर
अ. ‘बाबा अतीदक्षता विभागात होते. ते अत्यंत अत्यवस्थ स्थितीत (‘क्रिटिकल कंडिशन’मध्ये) होते. ते बेशुद्धावस्थेत असतांनाही त्यांच्या हाताच्या बोटांची मुद्रा होती. ‘त्यांचा जणू त्या स्थितीतही अंतर्मनातून नामजप चालू आहे’, असे मला वाटत होते.
आ. रुग्णालयात त्यांच्याभोवती प.पू. गुरुमाऊलींचे अस्तित्व सतत जाणवत होते.
इ. ते अतीदक्षता विभागात असूनही त्यांचा चेहरा पुष्कळ शांत आणि स्थिर वाटत होता.
ई. ‘ते गुरुदेवांच्या अनुसंधानात आहेत’, असे वाटत होते.’
४. श्री. शिवाजी उगले (साधक), निफाड, नाशिक.
४ अ. प्रांजळ : ‘आधुनिक वैद्य कुलकर्णी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायचे.’
५. श्री. धनंजय काळुंगे (साधक), निफाड, नाशिक.
५ अ.‘काका मोजकेच आणि विचारपूर्वक बोलत असत. ते सतत अंतर्मुख असत.’
६. सौ. सीमा शिरसाट (साधिका), निफाड, नाशिक.
६ अ. काकांनी केलेल्या औषधोपचारांनी बरे वाटणे : ‘मला होणार्या त्वचेच्या त्रासासाठी मी अन्य आधुनिक वैद्यांकडे २ वर्षे औषधोपचार घेतले, तरीही मला होणारा त्रास बरा झाला नाही. त्यानंतर मी आधुनिक वैद्य सुशील कुलकर्णी यांच्याकडे गेले. मी त्यांच्याकडे एकदाच गेले. तेव्हा त्यांनी अल्प खर्चातील औषधे देऊनही मला पूर्ण बरे वाटले आणि आतापर्यंत तो त्रास मला पुन्हा झाला नाही.
६ आ. आधुनिक वैद्य सुशील कुलकर्णी यांनी वैद्यकीय पेशाकडे व्यवसाय म्हणून कधी पाहिले नाही. एवढ्या महागाईच्या काळातही ते रुग्णांकडून अल्प प्रमाणात ‘फी’ घेत असत. त्यांनी दिलेल्या औषधाने रुग्णांना त्वरित गुण येत असे.’
७. श्री. नीलेश नागरे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४४ वर्षे) (साधक), नाशिक
अ. ‘कुलकर्णीकाकांचे निधन झाल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा मला त्यांच्या घरात शांतता जाणवत होती.
आ. ‘काकांच्या संपूर्ण घराभोवती पिवळ्या रंगाचे संरक्षककवच आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘काकांचा लिंगदेह शांत आणि स्थिर आहे’, असे मला जाणवले.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २८.१२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |