Trump Broadcasts Canada US Map : डॉनल्ड ट्रम्प यांनी प्रसारित केला कॅनडा हा अमेरिकेचा भाग असलेला नकाशा !
कॅनडाने केला विरोध !
वॉशिंग्टन (अमेरिका) : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘एक्स’वर अमेरिकेचा नकाशा पोस्ट केला आहे. यात कॅनडा अमेरिकेचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान ट्रुडो आणि इतर नेते यांनी ट्रम्प यांचा हा विचार पूर्णपणे फेटाळून लावला आहे. ट्रुडो यांनी ‘कॅनडा कधीही अमेरिकेचा भाग होऊ शकत नाही’, असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री मेलानी जोली म्हणाल्या की, ट्रम्प यांना कॅनडाची फारशी समज नाही. ट्रम्प यांना कॅनडाची अर्थव्यवस्था आणि लोकांच्या शक्ती यांची कल्पना नाही. आमची अर्थव्यवस्था आणि लोक खूप सशक्त आहेत. आम्ही कधीही धमक्यांसमोर झुकणार नाही. कॅनडाला नेहमीच अमेरिकेशी चांगले संबंध हवे आहेत; पण आमच्या सार्वभौमत्वावर कधीही तडजोड केली जाणार नाही.
ट्रम्प यांनी कॅनडातून आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल. कॅनडाचे अधिकारीही या शुल्काला उत्तर देण्याची सिद्धता करत आहेत. अशा स्थितीत दोन्ही देशांमध्ये व्यापारयुद्ध होण्याची भीती तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
ट्रम्प पनामा कालवा आणि ग्रीनलँड कह्यात घेण्याच्याही सिद्धतेत !
डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅनडासमवेतच पनामा कालवा आणि ग्रीनलँड हेही नियंत्रणात घेण्याचे विधान केले आहे. यासाठी सैन्य कारवाई करण्याची चेतावणी त्यांनी दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी दोन्हीवर अमेरिकेचे नियंत्रण महत्त्वाचे आहे.’ युरोपमधील ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक स्वायत्त प्रदेश आहे, जो अमेरिकेचा दीर्घकाळ सहयोगी आणि ‘नाटो’चा (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ नावाची जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना) संस्थापक सदस्य आहे. डेन्मार्कने ग्रीनलँड विकत देण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव नाकारल्यास त्यावर कर लादण्याचाही ट्रम्प यांनी प्रस्ताव दिला आहे.
या मागण्यांविषयी पनामाचे परराष्ट्रमंत्री जॅव्हियर मार्टिनेझ-आचा यांनी ट्रम्प यांच्या धमकीला ठामपणे नकार देत म्हटले की, ‘येथील कालवा पनामाच्या नियंत्रणात आहे आणि राहील !’
डेन्मार्कनेही ठामपणे सांगितले की, ग्रीनलँड ‘विक्री’साठी नाही. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी सांगितले की, आम्ही जवळचे सहयोगी आणि भागीदार असतांना आर्थिक सूत्रांवर एकमेकांशी भांडणे ही चांगली गोष्ट आहे, असे मला वाटत नाही.
ट्रम्प यांची हमासला पुन्हा चेतावणी
२० जानेवारीपूर्वी ओलिसांना सोडले नाही, तर विद्ध्वंस होईल !
ट्रम्प म्हणाले की, इस्रायलमधून अपहरण केलेल्या ओलिसांना २० जानेवारीपूर्वी सोडले नाही, तर ते हमाससाठी चांगले होणार नाही. मी कोणत्याही वाटाघाटींना हानी पोचवू इच्छित नाही; परंतु मी शपथ घेण्यापूर्वी ओलिसांच्या सुटकेवर करार केला नाही, तर मध्य-पूर्वेमध्ये विनाश होईल. सर्व काही उद्ध्वस्त होईल. मला वेगळे काही सांगायची आवश्यकता नाही.
ओलिसांची सुटका करण्यासाठी ट्रम्प यांनी हमासला यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे. २० जानेवारीला ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.