चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !
सोलापूर येथे मूक आंदोलनात हिंदु जनजागृती समितीची मागणी
सोलापूर – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणार्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय्य अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्यांकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे ८ जानेवारी या दिवशी टिळक चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले. यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी रस्त्यावरून ये-जा करणारे अनेक लोक धर्मप्रेमींच्या हातातील फलक थांबून आवर्जून वाचत होते.
बांगलादेशी हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन !
सातारा, ८ जानेवारी (वार्ता.) – बांगलादेशी हिंदूंवर होणार्या आक्रमणाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सातारा येथे मूक निदर्शने करण्यात आली. जिल्ह्यातील कोरेगाव, कराड, वडूज आणि सातारा या ठिकाणी ही मूक निदर्शने झाली. या मूक निदर्शनांमध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. हातात फलक घेऊन मुख्य चौकात उभे राहून ही निदर्शने करण्यात आली. हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशावर भारताने राजकीय दबाव वाढवावा, अशी एकमुखी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली. यामध्ये इस्कॉन, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी, धर्मप्रेमी तसेच शिवसेना, भाजप आदी राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.