हिंदुस्थानच्या विरोधात काम करणार्यांची स्मारके आपण का जपत आहोत ? – खासदार नरेश म्हस्के
नवी देहली – भारतात ३ सहस्र ६८१ स्थळे ऐतिहासिक संरक्षित स्थळे म्हणून संरक्षित आहेत. यातील अनेक स्थळे राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीत, तरीही त्यांना इतकी वर्षे ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख दिली जात आहे. ज्यांनी हिंदुस्थानच्या विरोधात काम केले, अशा लोकांची स्मारकेसुद्धा संरक्षित स्थळांमध्ये आहेत. अशी स्थळे आपण का संरक्षित करत आहोत ? यापुढे अशी ठिकाणे या सूचीतून वगळावीत. कर्नाटकमध्ये कुमटा येथे दोन इंग्रज अधिकार्यांची कबर संरक्षित सूचीत समाविष्ट आहे. ज्यांनी आपल्यावर राज्य केले, अत्याचार केले, अशांची कबर हा राष्ट्राचा ऐतिहासिक वारसा कसा ठरू शकतो ? असा प्रश्न खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. नगरविकास आणि गृह विभागाची बैठक ७ जानेवारी या दिवशी संसद भवन, नवी देहली येथे पार पडली. या समितीचे सदस्य म्हणून शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी वरील सूत्रे मांडली.
या वेळी त्यांनी राज्यातील महत्त्वपूर्ण स्थळांच्या विकासासाठी भरीव आर्थिक प्रावधान करावे, अशी मागणी केली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्याला समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे; मात्र महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण स्थळांचा राष्ट्रीय विकासकामांमध्ये अद्याप समावेश झालेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड, जन्मस्थान शिवनेरी, तसेच पंढरपूर, कोल्हापूर अशी अनेक ठिकाणे आहेत. पुढील काळात त्यांचा विकासकामांमध्ये समावेश करावा आणि त्यासाठी मोठे आर्थिक प्रावधान करावे.’’
‘पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार संरक्षित स्मारकांच्या आजूबाजूच्या परिसरात विकास करता येत नाही. या नियमातही पालट करावा’, अशी सूचनाही त्यांनी केली.