पंढरपूर येथे दर्शनासाठी शुल्क घेऊन भाविकाची फसवणूक करणार्यावर गुन्हा नोंद !
पंढरपूर – पालघर जिल्ह्यातील कुणाल घरत हे त्यांच्या कुटुंबासह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्या वेळी त्यांच्याकडून दर्शनासाठी शुल्क म्हणून ११ सहस्र रुपये घेऊन भाविकांची फसवणूक करणार्या चिंतामणी तथा मुकुंद मोहन उत्पात यांच्यावर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संबंधित भाविक हे लवकर दर्शन कसे मिळेल ? यांसाठी चौकशी करत होते. त्या वेळी दर्शनासाठी ‘पास’ मिळतो का ? अशी विचारणा करत असता चिंतामणी तथा मुकुंद मोहन उत्पात यांनी लवकर दर्शन मिळण्यासाठी मंदिर समितीला ५ सहस्र १ रुपये देणगी, तर मला ६ सहस्र रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानंतर उत्पात यांनी तुकाराम भवन येथील देणगी कार्यालयात जाऊन ५ सहस्र १ रुपयांची देणगीची पावती संबंधित भाविकाला दिली. यानंतर मंदिराच्या उत्तर दरवाजातून प्रवेश करीत असतांना तेथील साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन घोळकर यांनी चौकशी केली असता, देवदर्शन करून देण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर उत्पात यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात कलम ३१८ (३) (४) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंदिरे समिती कोणतेही शुल्क आकारत नाही ! – मनोज श्रोत्री, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान
या संदर्भात मंदिरे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंदिरे समिती कोणतेही शुल्क आकारत नाही. हे दर्शन पूर्णत: नि:शुल्क आहे. त्यामुळे भक्तांनी कोणासही ‘श्रीं’च्या पदस्पर्श दर्शनासाठी आर्थिक व्यवहार करू नये.
बाहेरील व्यक्ती ही मंदिराच्या आतील साखळीशी जोडल्याविना कोणत्याही भाविकांना दर्शन घडवू शकत नाही ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, राष्ट्रीय प्रवक्ते, वारकरी संप्रदाय पाईक संघ
या अगोदरही आम्ही मंदिर प्रशासनास सूचना केली होती की, ‘दर्शन व्यवस्था पूर्णत: नि:शुल्क आहे; कुणीही पैसे मागितल्यास व्यवस्थापनाशी संपर्क साधावा’, असे फलक दर्शन भागात ठिकठिकाणी लावावेत. असे फलक पूर्वी उत्पात-बडवे सेवेला असतांना होते, तसेच ‘पैसे घेऊन दर्शनाला आत कुणी सोडते का ?’, हे पहाण्यासाठी ‘वार्डन अधिकारी’ होते. ही व्यवस्था मंदिरे समितीने का बंद केली ? बाहेरील व्यक्ती ही मंदिराच्या आतील साखळीशी जोडल्याविना कोणत्याही भाविकांना दर्शन घडवू शकत नाही. त्यामुळे कारवाई करतांना समितीने बाहेरील व्यक्तीसमवेत यात सहभागी व्यक्तींवरही गुन्हा नोंद केल्याविना या प्रकाराला आळा बसणार नाही. प्रत्येक वेळी आपल्या लोकांना ‘अभय’ आणि केवळ बाहेरील दोषींवर कारवाई यांमुळेच असे प्रकार घडत आहेत.