डिचोली येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने, तर वास्को येथे विश्व हिंदु परिषदेच्या वतीने पोलिसांत तक्रारी

धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी दत्ता नायक यांच्या विरोधात तक्रारींची शृंखला चालूच

डिचोली येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी पोलीस ठाण्यात निवेदन देतांना

पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) – मंदिरे आणि मठ यांना ‘लुटारू’ असे संबोधून समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक कलह निर्माण करणारे मडगाव येथील उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करणार्‍या तक्रारी ६ जानेवारी या दिवशी डिचोली आणि वास्को येथे अनुक्रमे ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना’ आणि ‘विश्व हिंदु परिषद’ यांनी केल्या आहेत.

यापूर्वी दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात काणकोण, पणजी आणि मडगाव येथे तक्रार प्रविष्ट झालेल्या आहेत; मात्र पोलिसांनी अजूनही उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंद केलेला नाही. सूत्रानुसार पोलीस या प्रकरणी अन्वेषण करत असून अन्वेषणानंतर दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात विधान करणारे फादर बॉलमेक्स आणि जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांची ‘डी.एन्.ए.’ (डी.एन्.ए. : डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करण्याची मागणी केल्याने प्रा. सुभाष वेलींगकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी उद्योजक दत्ता दामोदर नायक यांच्या विरोधात गुन्हा नोंद का केला जात नाही ?’, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.