मडगाव (गोवा) येथील रस्ता बंद आंदोलनातील १४१ जणांच्या विरोधात फातोर्डा पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र

ख्रिस्त्यांनी ५ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मडगाव येथे केलेले ‘रस्ता बंद’ आंदोलन

मडगाव, ६ जानेवारी (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी ‘हिंदू रक्षा महाआघाडी’चे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी विधान केले होते. त्यानंतर ख्रिस्त्यांनी ५ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मडगाव येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करून प्रा. सुभाष वेलिंगकर यांना कह्यात घेण्याची मागणी केली होती. या वेळी वाहनचालकांची गैरसोय झाली होती. ‘रस्ता बंद’ आंदोलन केल्याच्या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अधिवक्त्या प्रतिमा कुतिन्हो, त्यांचे पती साविओ कुतिन्हो आणि फिडॉल परेरा यांच्यासह एकूण १४१ जणांच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे. या आंदोलनाच्या वेळी एका दुचाकीस्वाराला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. मारहाणीच्या प्रकरणी दोघांच्या विरोधात, तर दुचाकीचालकाला रोखणार्‍या ८ जणांच्या विरोधा आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले आहे.

१. ख्रिस्त्यांनी ५ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मडगाव येथील ओल्ड मार्केट जंक्शन, ‘एस्.जी.पी.डी.ए.’ मार्केट, ‘के.एफ्.सी.’ इमारत जंक्शन यांखेरीज राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद केली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला होता. या प्रकरणी अधिवक्त्या प्रतिमा कुतिन्हो, साविओ कुतिन्हो आणि फिडॉल परेरा यांच्यासह एकूण ५०० जणांच्या विरोधात अनधिकृतपणे जमाव करणे, सार्वजनिक रस्ते बंद करणे, सरकारी आदेशाचा अवमान करणे, मानवी सुरक्षितता धोक्यात येण्यासारखे कृत्य करणे, अडवणूक करणे, सरकारी कर्मचार्‍यांच्या कर्तव्यात बाधा आणत आक्रमण करणे आदी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. चौकशीच्या वेळी क्लाइव्ह कार्दाेज आणि नेव्हिल फर्नांडिस यांना कह्यात घेण्यात आले होते अन् त्यांना त्याच दिवशी जामीन संमत झाला होता.

२. आंदोलनाच्या वेळी कदंब बसस्थानकानजीक दुचाकीचालक नियाज अहमद याची दुचाकी अडवून त्याला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी संशयित आगुस्तिन आणि अन्य २ जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. फातोर्डा पोलिसांनी चौकशीच्या अंती या २ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.

३. जुने मार्केट सर्कलनजीक शालेय मुलीला दुचाकीवरून घेऊन जाणार्‍या वडिलांची अडवणूक करणार्‍या अज्ञाताच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट (दाखल) झाला होता. फातोर्डा पोलिसांनी चौकशीच्या अंती ८ जणांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले आहे.