सातारा शहर पोलिसांना मिळणार वाढदिवसाची सुटी !

सातारा, ६ जानेवारी (वार्ता.) – शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कुटुंबियांसमवेत पूर्ण वेळ देता यावा, यासाठी त्यांना विशेष सुटी दिली जाणार आहे. १ जानेवारीपासून शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी हा उपक्रम चालू केला आहे. यामुळे पोलिसांचे कुटुंबीय आनंदी झाले आहेत.

पोलीस दलात काम करतांना पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असतो. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अल्प आहे. १२ घंटे काम करण्यासमवेतच यात्रा बंदोबस्त, मंत्र्यांचे दौरे, ऐनवेळी उद्भवणारे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न यांसाठी अविरत काम करावे लागते. यामुळे पोलिसांचे स्वास्थ्य सतत अस्वस्थ रहाते. कामाचे अनिश्चित स्वरूप असल्यामुळे पोलिसांचे जेवणही अवेळी होते. पोलिसांना या सर्व कामातून किमान त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतःला आणि कुटुंबियांना वेळ देता यावा, या उद्देशाने नववर्षानिमित्त सुटीची भेट देण्यात आली आहे. ज्या पोलीस कर्मचार्‍यांचा दुसर्‍या दिवशी वाढदिवस आहे, त्या पोलीस कर्मचार्‍यांचा आदल्या दिवशी पोलीस ठाण्यात केक कापून वाढदिवस साजरा करायचा आणि त्याला शुभेच्छा द्यायच्या, तसेच दुसर्‍या दिवशी त्या पोलीस कर्मचार्‍याला विशेष सुटी संमत करायची. असा उपक्रम १ जानेवारीपासून चालू करण्यात आला आहे.