मुलांवर १६ संस्कारांप्रमाणेच वाचन संस्कार केला पाहिजे ! – मंगला वरखेडे, ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यकार
पुणे – सध्याचा काळ हा मूल्य संभ्रमाचा काळ आहे. मुलांमधील उत्साह, कल्पकता जोपासली आणि जपली पाहिजे. १६ संस्कारांप्रमाणे वाचनसंस्कारही केला पाहिजे, त्याचे पालन केले पाहिजे. आज नवी ज्ञानदृष्टी देणार्या बाल साहित्याची आवश्यकता आहे, असे मत ज्येष्ठ लेखिका आणि बालसाहित्यकार मंगला वरखेडे यांनी व्यक्त केले.
वरखेडे ‘विवेक साहित्य मंच’, ‘विवेक व्यासपीठ’, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’, ‘विदिशा विचार मंच’, ‘युवा विवेक’, ‘पुणे मराठी ग्रंथालय’, ‘श्री मुकुंद भवन ट्रस्ट’ आणि ‘शिक्षण विवेक’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘बालसाहित्य संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आजच्या मुलांच्या पालकत्वाचे दायित्व केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते त्यांच्या भोवतालच्या प्रत्येक घटकाचे दायित्व आहे. प्रज्ञावंतांची पिढी घडवणे हे आव्हान आहे, असेही वरखेडे म्हणाल्या.