‘देशातील भिकारी शिर्डी येथे येऊन जेवतात’, असे म्हणणे हा साईभक्तांचा अपमान ! – संजय शिरसाट, सामाजिक न्यायमंत्री

माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले’, या विधानाचे प्रकरण

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील

शिर्डी – माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी ‘संपूर्ण देश शिर्डी येथे येऊन फुकट जेवण जेवतो, तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत’, असे केलेले विधान हा साईभक्तांचा अपमान आहे. शिर्डीत जगातील लोक श्रद्धेपोटी येतात आणि कोट्यवधी रुपयांची देणगी देतात. त्यामुळे शिर्डीतील साई संस्थानने जर एखादा चांगला उपक्रम हाती घेतला, तर चुकीचे काय ? अन्नदान हे चांगले कार्य आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे आमदार आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.

सुजय विखे-पाटील यांनी साईभक्तांची क्षमा मागावी ! – अक्षय महाराज भोसले, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्‍चित साहाय्य करतील. आलेल्या भाविकांना विनामूल्य प्रसाद वाटप करू नये, अशी मागणी करणे आणि त्यांना ‘भिकारी’ असे संबोधन करणे हे दुर्दैवी आहे. आम्ही सुजय विखे-पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. भूतकाळात शिर्डीमध्ये साईबाबांना कुणी पळीभर तेलही दिले नव्हते. आता पुन्हा तशीच भावना लोकांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी वेळीच सुजय विखे पाटील यांनी साईभक्तांची क्षमा मागावी.

अन्नदानामागे प्रेरणा मोठी असल्याने भिकारी शब्द वापरणे योग्य नाही ! – डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधानपरिषद

कोल्हापूर – ‘भिकारी’ हा शब्द शिवीसारखा आहे. त्यामुळे तो कुणीच वापरू नये. कुणी कुणाकडे खासदारकीची मागणी करते, तर त्याला ‘भिकारी’ म्हणायचे का ? कुणी कुणाकडे वेगवेगळ्या प्रकारे सहकार्य मागते, त्याला ‘भिकारी’ म्हणायचे का ? मुळामध्ये अन्नदान आणि भीक यांतील भेदच ज्या लोकांना कळत नाही, ‘ते सुसंस्कृत आणि आस्तिक आहेत’, असे मला वाटत नाही. अन्नदानाच्या मागे मोठी प्रेरणा असल्याने अन्नदानामध्ये भीक हा शब्द वापरणे योग्य नाही, असे मत विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. त्या कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होत्या.

काय म्हणाले होते सुजय विखे-पाटील ?

विनामूल्य भोजन देण्यापेक्षा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी पैसा व्यय करा !

साई मंदिरात प्रसादालयात आपण विनामूल्य भोजन देतो; मात्र भोजनासाठी प्रत्येकाकडून २५ रुपये घेतले पाहिजेत. यातून जो पैसा वाचेल, तो पैसा मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व्यय केला पाहिजे; कारण संपूर्ण देश इथे येऊन फुकट जेवण करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी या ठिकाणी गोळा झाले आहेत. हे योग्य नाही. संस्थानने ‘आपण काय करत आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. संस्थानने २९८ कोटी रुपयांचे संकुल बांधले आहे; मात्र ते दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही. शैक्षणिक संकुलाच्या इमारतीवर व्यय केला जात आहे; पण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी व्यय केला जात नाही. गुणवत्तेवर पैसा व्यय झाला, तरच विद्यार्थी घडतील. त्यामुळे साई मंदिरातील विनामूल्य भोजन बंद करा ! यासाठी आंदोलनाची वेळ आलीच, तरी आपण ते करू, असे वक्तव्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला विरोध केला जात आहे.

संपादकीय भूमिका

साईबाबांचे मंदिरच नाही, तर हिंदूंच्या कोणत्याही मंदिरात भाविकांना प्रसाद उपलब्ध करून देणे, ही तेथील विश्‍वस्त आणि मंदिर समित्या यांची एक प्रमुख सेवाच आहे. असा प्रसाद उपलब्ध करून देणे, ही भारताची प्राचीन परंपरा आहे ! शिर्डीचा विचार केल्यास शिर्डी देवस्थानाला कोट्यवधी रुपयांची देणगी मिळत असेल, तर त्यातून देवस्थानाने सर्वांना विनामूल्य प्रसाद देण्यात चूक काय ? भाविकांनी मंदिरांच्या/देवतांच्या श्रद्धेपोटी दिलेला निधी हा सामाजिक अथवा शैक्षणिक कामांसाठी नाही, तर धार्मिक कार्यासाठीच वापरला जाणे अपेक्षित आहे !